आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीओ इमारत झाली ५९ वर्षांची, कार्यालयासाठी प्रशासनाकडून नवीन जागेचा शोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रादेशिक परिवहन इमारतीची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. २४ खिडक्या आणि पासिंगसाठी शेंद्रा एमआयडीसीत नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. यामध्ये श्रम, वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य जागेचा शोध घेण्याचे काम प्रगतिपथावर आहे. सर्वांसाठी सोयीचे होईल, अशा ठिकाणी ही भव्य वास्तू उभारली जाणार आहे.
आरटीओ कार्यालयाची इमारत ५९ वर्षांची झाली आहे. भिंती ढासळायला लागल्या असून इमारतीचे छत पोकळ झाले आहे. हलका पाऊस जरी पडला तरी कार्यालयात सर्वत्र पाणीच पाणी होते. वाहनांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्याबरोबरीने उत्पन्नातही वाढ झाली आहे. पण जीर्ण झालेली इमारत कमी मनुष्यबळ हे चित्र अद्याप बदललेले नाही. शौचालय, पार्किंगसाठी जागा पिण्याचे पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा येथे अभाव असल्यामुळे दररोज दीड हजार नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोणतेही काम वेळेवर होत नाही.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वाहन पासिंगसाठी नागरिकांना शहरापासून २३ किमी अंतरावरील शेंद्रा एमआयडीसी येथे जावे लागते. यामध्ये पेट्रोल, डिझेल या राष्ट्रीय संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. शिवाय नागरिकांचा अनमोल वेळ पैसा वाया जात असून प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

हा प्रश्न कायमचा मार्गी लागावा, एकाच छताखाली सर्व कामे व्हावीत, अशी औरंगाबाद, जालना बीड जिल्ह्यांतील हजारो नागरिक, ग्राहक प्रतिनिधी मागणी करत आहेत. त्याची उशिरा का होईना, प्रादेशिक परिवहन अधिकारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दखल घेतली असून जलद गतीने नवीन आरटीओ कार्यालय उभारण्यासाठी नवीन जागेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंदराव सैंदाणे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
नक्षत्रवाडी : येथेशासनाची ५३ एकर जागा आहे. त्याचा प्रस्ताव आरटीओ कार्यालयास दिला होता. पण या जागेवर अतिक्रमण झालेे आहे. ते कुणी काढावे या भानगडीत पडण्याचे आरटीओ प्रशासनाने टाळले आणि त्यामुळे हा प्रस्ताव कागदावरच विरला.
पडेगावातील जागा सोयीची : पडेगावपरिसरात शेळी-मेंढीपालन प्रशिक्षण केंद्राजवळ शासनाच्या मालकीची भरपूर जागा आहे. हायवे जवळच असल्याने येथे आरटीओ कार्यालय उभारता येईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर सर्वांना सोयीचे होईल, अशी जागा शोधण्याचे काम तातडीने पूर्ण केले जाणार असल्याचे सैंदाणे यांनी सांगितले.
हनुमान टेकडी : बीबीका मकबऱ्याच्या पाठीमागील हनुमान टेकडीजवळ शासकीय जागा आहे. येथे आरटीओ कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ठेवला होता. ही जागा खूपच आतमध्ये येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.