आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता"आरटीओ'त आतून कीर्तन, बाहेरून तमाशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आरटीओ कार्यालयांतून दलाल हद्दपार करण्याच्या परिवहन आयुक्तांच्या घोषणेला सोमवारी औरंगाबाद शहरात हरताळ फासला गेला. जनतेने थेट कार्यालयात येऊन व्यवहार करावेत, असे आवाहन आरटीओने केले असले तरी कार्यालयाबाहेर एजंट आपले काम करत असल्याचे सोमवारी आढळून आले. एजंटांची गरज भासावी, अशीच या कार्यालयातील व्यवस्था असल्यामुळे एजंटांना हटवू नये, अशी प्रतिक्रिया काही नागरीकांनी दिली.

आरटीओ कार्यालयांची दलालांच्या गराड्यातून मुक्तता करण्याची घोषणा परिवहन आयुक्तांनी केली आहे. त्यासाठी १९ जानेवारी ही शेवटची तारीख होती. त्यामुळे आज या कार्यालयातील चित्र काय होते, याचा आढावा घेतला असता, कार्यालयाच्या आवारात एजंट आपले काम करीत असल्याचे आढळून आले. हे दलाल सोमवारी गेटच्या बाहेर बसले होते. मात्र, त्यांची कार्यालय आणि अधिकाऱ्यांच्या दालनातील रेलचेल कायम दिसली. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील चित्र आतून कीर्तन, बाहेरून तमाशा असेच होते.

सोमवारपासून आरटीओ कार्यालयाच्या आवारात कुणी दलाली करत असल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला जबाबदार धरून कारवाई करण्याचे फर्मान परिवहन आयुक्तांनी काढले आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थािनक कार्यालयांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित होते. त्या व्यवस्थेऐवजी परिवहन कार्यालयात एजंटांची ये-जा सुरूच होती.
केवळ टेबल-खुर्च्या हलल्या

दलालांना कार्यालयाच्या आवारातून हुसकावण्यात आले असले तरी त्यांनी कार्यालयाबाहेर बस्तान मांडल्याचे औरंगाबाद परिवहन कार्यालयातील चित्र आहे. जागा बदलली असली तरी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात हे दलाल यशस्वी होत होते. कागदपत्र घेऊन काही एजंट परिवहन कार्यालयात जात येत होते. त्यांची कामे होतच होती, असेही काल आढळून आले. त्यामुळे अनेक नागरिकांनी अशा एजंटचाच उपयोग करून आज आपली कामे करवून घेताना दिसत होेते.
असे फावते दलालांचे
कोणत्या कामासाठी कोठे जावे, याबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले जात नाही. शिवाय अधिकारी, कर्मचारी थेट आलेल्या लोकांच्या कामाला विलंब लावतात. एजंटामार्फत काम लवकर होते, असा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे स्वत:हून काम करण्यापेक्षा अनेक जण दलालांना पैसे मोजून कामे करून घेतात. अशा परिस्थितीत या कार्यालयातून एजंटांना हटवू नये, अशा उपरोधिक प्रतिक्रियाही नागरिकांनी दिल्‍या.

वाहनधारकाला पाठवले एजंटाकडे
सिल्लोड तालुक्यातून आलेल्या बुलेट मालकाला बुलेटसाठी मनपसंत नंबर हवा होता. त्याने परिवहन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने वाहनधारकाला एका एजंटला भेटण्यास सांगितले. त्यानुसार सोमवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास तो ग्रामस्थ एजंटला भेटला. एजंटने पसंतीच्या क्रमांकासाठी ठरलेल्या दराशिवाय वरून किती पैसे लागतील, हे सांगितले. हे पैसे दिल्‍याशिवाय हा क्रमांक मिळणारच नाही, असेही स्पष्ट केले. मात्र, िनयमापेक्षा जास्त पैसे द्यायची तयारी नसल्याचे सांगत बुलेट मालकाने काढता पाय घेतला.

पोलिसांशी पत्रव्यवहार
-कार्यालयात दलालांना थारा नाही. कोणी तक्रार केल्यास रीतसर कारवाई केली जाईल. आवारातील बिनकामी गर्दी संदर्भात पोलिस प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे.नागरिकांनी स्वत:चे काम स्वत:च करावे.
गोविंद सैंदाणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी,औरंगाबाद

हातकडी घालण्याची धमकी
-एलपीजी रिक्षा पासिंगसंदर्भात गेलो असता कर्मचारी उद्धटपणे बोलले. योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांनी मला हातकड्या घालण्याची भाषा केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे. आर. एम. लिंगायत, नागरिक, औरंगाबाद