आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रुचा’ने तयार केला एकाच वेळी ५०० किलो वजन नेणारा रोबोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतील बहुतांश कंपन्यांमध्ये रोबोट एकाच ठिकाणी उभे राहून काम करतात. मात्र, वाळूज येथील रुचा इंजिनिअरिंगचा रोहित दाशरथी त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षांच्या संशोधनानंतर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ५०० किलोपर्यंतचे ओझे वाहून नेणारा रोबोट तयार केला आहे. तो एकाच वेळी दहा माणसांचे काम करतो. त्यामुळे तो भारतीय उद्योगांसाठी उपयुक्त ठरू शकतो.

आजकाल बहुतांश बड्या कंपन्यांमध्ये किमान दहा ते पंधरा ठिकाणी उत्पादन तयार करणारी यंत्रे लावली जातात. प्रत्येक ठिकाणी ठरावीक वेळेनंतर मोठ्या वजनाचा कच्चा माल (लोखंडी प्लेट्स, गोलाकार लोखंडी खांब आदी) लागतो. तो पोहोचवण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो. अलीकडील काळात उत्पादनाचे प्रमाण वाढल्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कच्चा माल यंत्रापर्यंत पोहोचवण्याची गरज वाढत चालली आहे. उपलब्ध मनुष्यबळात ते दरवेळी साध्य होतेच असे नाही. त्यामुळे माल वाहून नेणारा रोबोट तयार करता येईल का, असा विचार रुचा इंजिनिअरिंगच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे संचालक रोहित दाशरथी यांनी सुरू केला. अमेरिकेतील कार्नेक मेलॉन विद्यापीठात रोबोटिक्स इंजिनिअरिंगचा पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी रोबोट नेमका कसा असावा या दिशेने विचार सुरू केला.
दोनवर्षांचे संशोधन : रोहितम्हणाले की, दोन वर्षांत माझ्यासह कुणाल बोराडे, भावेश वगाडिया, अमित राहंगदळे, पवनकुमार शहाणे, शरद पडोळ, योगेश्वर काळे, सुशील हिवाळे यांनी सुमारे १५ लाख रुपये खर्चून मालवाहतूक करणारा रोबोट तयार केला. राघव (रुचा ऑटो गायडेड हेवी असिस्ट व्हेइकल) असे त्याचे नामकरण करण्यात आले असून दोन महिन्यांत त्याचे लाँचिंग होणार असून पुढील वर्षभरात २५० रोबोट तयार होणार आहेत. त्यांची क्षमता ५०० वरून दीड हजार किलो वजनाच्या कच्च्या मालाची वाहतूक करण्यापर्यंत वाढवली जाणार आहे.
असेकाम करतो राघव : रुचाकंपनीत उत्पादन करणाऱ्या सात यंत्रालगत एक १३४ मीटर लांबीचा मेटल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. मालवाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचे हूक रोबोटला लावण्यात येते. कमांड देताच राघव ट्रॅकवरील यंत्राजवळ माल घेऊन जातो. तेथे एका मिनिटात माल उचलून घेतल्यावर तो पुढील यंत्राकडे जातो. एका मिनिटात तो २२ मीटर अंतर कापतो.

अन्य रोबोट
रुचाइंजिनअरिंगच्या दोन प्लँटमध्ये बजाजसह १७ आंतरराष्ट्रीय कंपन्यांना दुचाकी तसेच ऑटोसाठी लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती केली जाते. त्यात सध्या २५ रोबोट वेल्डिंग, पेंटिंग, प्लेटिंग आदी कामे करतात.

सुरक्षेचे सर्व उपाय : बॅटरीवर सलग आठ तास चालणारा रोबोट ट्रॅकवरून फिरत असताना त्याच्यासमोर कोणी आल्यास तो जागेवर थांबतो आणि हॉर्नही वाजवतो. समोरील व्यक्ती हटल्यावरच पुढे सरकतो. त्यामुळे कोणत्याही अपघाताचा धोका राहत नाही, असे रोहित म्हणाले. दहा माणसे जेवढे काम करतात तेवढे राघव करतो, असेही त्यांनी सांगितले.

२५० रोबोटचे उद्दिष्ट
संजीव ऑटोसह काही कंपन्यांना राघव वापरासाठी देण्यात आला होता. त्यांनी तो उपयुक्त असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे वर्षभरात २५० राघवची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. उमेशदाशरथी, अध्यक्ष, रुचा इंजिनिअरिंग.

वेळेचे गणित महत्त्वाचे
कंपन्यांत उत्पादननिर्मिती करणाऱ्या यंत्रापर्यंत अवजड कच्चा माल पोहोचवण्याच्या कामासाठी विदेशात रोबोटचा वापर होतो. आपल्याकडे कामगारच हे काम करत होते. त्यात वेळेचे गणित प्रत्येक ठिकाणी साध्य होतेच असे नाही. ते साधले जावे. उत्पादनाचा वेग वाढावा म्हणून आम्ही राघवची निर्मिती केली आहे. रोहितदाशरथी, संचालक, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रुचा इंजिनिअरिंग
बातम्या आणखी आहेत...