आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल सत्तारांसाठी आमदार निधी खर्चाचेच नियम बदलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार तथा पशुसंवर्धन विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी आमदार निधी खर्च करण्याच्या नियमांतच बदल केला आहे. अन्य स्पर्धकांनी मतदारसंघांत रुग्णवाहिका सुरू केल्याने आपलीही रुग्णवाहिका दिसावी यासाठी सत्तार व त्यांचे नातेवाईक संचालक असलेल्या दोन खासगी शैक्षणिक संस्थांना दोन रुग्णवाहिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसे पत्र जिल्हा प्रशासनाला बुधवारी प्राप्त झाले. आमदार निधीतून खासगी संस्थांना मदत केली जात नाही. मात्र सत्तार यांच्या हट्टासमोर कर्तव्यकठोर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हात टेकले असून विशेष बाब म्हणून आमदार निधीतून खासगी संस्थांना रुग्णवाहिका देण्याच्या निर्णयावर त्यांनी स्वाक्षरी केल्याचे समजते.

सत्तार यांच्या आमदार निधीतून १६ लाख तर औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार सुभाष झांबड यांच्या निधीतून तेवढीच रक्कम रुग्णवाहिका खरेदीसाठी देण्यात आली आहे. ज्या संस्थांना रुग्णवाहिका देण्यात आल्या त्या दोन्हीही संस्थांवर सत्तार यांचे नातेवाईक संचालक म्हणून आहेत.

का हा खटाटोप?
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोटे-इद्रिस मुलतानी मित्रमंडळ (३), सुनील पाटील मित्रमंडळ (२)यांच्याकडे मिळून ५ रुग्णवाहिका आहेत. त्या स्वखर्चाने चालविल्या जातात. त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. याचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून सत्तार यांनी शासकीय खर्चाने रुग्णवाहिका खरेदी करून त्या स्वत:च्या मालकीच्या संस्थांकडे दिल्याचा आरोप ज्ञानेश्वर मोठे यांनी केला आहे. समाजसेवा करायची असेल तर स्वखर्चाने करावी, असा टोला मोटे यांनी लगावला.
काय आहे खर्चाचा नियम?
आमदार निधी हा सार्वजनिक हितासाठी वापरला जातो. त्यात रस्ते, सामजिक सभागृह, व्यायामशाळा उभारल्या जाऊ शकतात. मात्र कोणत्याही खासगी संस्थांना आमदार त्यांचा निधी देऊ शकत नाही. आमदार निधी हा सार्वजनिक असतो. जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल, अशा कामांसाठी तो वापरला जातो. सर्वाधिक निधी हा रस्त्यांच्याच कामांसाठी वापरला जात असल्याचे दिसते. मात्र हा निधी खासगी संस्थांना दिला जात नाही. सिल्लोडसाठी विशेष बाब म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
सत्तार यांच्यासाठी काढण्यात आलेला आदेश काय म्हणतो?
अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून अब्दुल सत्तार व सुभाष झांबड या दोन आमदारांच्या निधीतून प्रगती शिक्षण संस्था व नॅशनल एज्युकेशन सोसायटी या दोन खासगी संस्थांना प्रत्येकी १६ लाखांच्या रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी देण्यात येते. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावे त्या खरेदी केल्या जातील. रुग्णवाहिकांची देखभाल-दुरुस्ती तसेच त्यावर कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची असेल, असे उपसचिव अ. शि. बेळगुद्री यांनी राज्यपालांच्या आदेशावरून काढलेल्या विशेष आदेशात म्हटले आहे. याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली असून आठ दिवसांत अंमलबजावणी होईल.
या आहेत संस्था
प्रगती शिक्षण संस्था, सोयगाव,
नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड
या दोन्हीही संस्थांवर सत्तार यांचे वर्चस्व आहे. त्यांना प्रत्येकी १६ लाख रुपये रुग्णवाहिका घेण्यासाठी दिले जातील. जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत ही खरेदी होईल. खरेदीनंतर मालकी शैक्षणिक संस्थांकडे जाईल. देखभाल, दुरुस्ती तसेच कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी त्या संस्थांवर असेल.

हा तर स्वत:चा उद्धार
जनतेच्या सुख दुःखात सत्तार यांचा कधीही सहभाग नसतो. शासनाच्या पैशावर स्वत:च्या नावाचा उद्धार व्हावा यासाठी शासनाच्या निधीचा ते वापर करतात. आयजीच्या जिवावर बायजी उधार असा हा प्रकार आहे. सत्तारांचे पितळ या निमित्ताने उघडे पडले. ते नेमके काय करतात हे उघड झाले.
ज्ञानेश्वर मोटे, जिल्हा परिषद सदस्य, सिल्लोड.