आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाद झाल्याची अफवा, दहा रुपयांची नाणी कुणीच घेईना; सर्वसामान्य त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दहा रुपयांची नाणी चलनातून बाद झाल्याच्या भीतीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. बाजारातील काही विक्रेते नाणी स्वीकारत नाहीत. तर अचानक नाण्यांचा ओघ वाढल्याने ती ठेवण्यास जागा नसल्याचे कारण देत काही बँकाही नाणी जमा करून घेण्यास नकार देत आहेत. रिझर्व्ह बँकेने मात्र १० रुपयांची नाणी चलनात असून ती विक्रेते आणि ग्राहकांनाही स्वीकारणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. तर नाणी नाकारणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकतो, अशी माहिती कायदेतज्ज्ञ देत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरला नोटाबंदीनंतर १० रुपयांचे नवीन नाणे बाजारात आले.

यावर रुपयाचे चिन्ह नसल्याने ते खोटे असल्याच्या अफवा पसरल्या. याच सुमारास हे नाणे बंद झाल्याच्या अफवांमुळे नागरिकांनी ती बँकांत जमा करण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त होते. व्यावसायिकांकडे नाणी वाढल्याने ते ती बँकांत जमा करू लागले. मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांचे करन्सी चेस्ट अधिक असल्याने ते नाणी जमा करून घेत आहेत. मात्र, काही खासगी, सहकारी आणि शेड्युल्ड बँकांत जागा कमी असल्याने ते नाणी जमा करून घेण्यास नकार देत आहेत. बँका नाणी घेत नाहीत म्हणून आता व्यापारीही नाणी स्वीकारत नाहीत. या चक्रात सर्वसामान्य भरडला जात आहे.
 
आरबीआयचा खुलासा : रिझर्व्ह बँकेच्या प्रधान सल्लागार अल्पना किलावाला यांनी २० नोव्हेंबर २०१६ रोजी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे १० रुपयांचे नाणे चलनातून बाद होणार नसल्याचे म्हटले आहे. काही लोक अज्ञानामुळे १० रुपयांचे नाणे स्वीकारत नाहीत. मात्र, त्यास कायदेशीर वैधता असून १० रुपयांचे नाणे चलनात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
नाकारत नाही : व्यापाऱ्यांनातर सुटी नाणी हवी असतात. काही व्यापारी १० रुपयांची नाणी नाकारत असतील. ते चुकीचे आहे. उलट दिवाळीत तर आम्हाला सुट्या पैशांची आवश्यकता होती.
- युसूफ मुकाती, व्यापारी, टिळकपथ
 
जागा कमी, तरी नाकारत नाही
आमच्या बँकांत नाणी ठेवण्यास जागा कमी असली तरी आम्ही ते नाकारत नाही. पण बंद होण्याच्या अफवांमुळे साठा वाढल्याने आम्ही सीसीच्या ग्राहकांना काही रक्कम दहाच्या नाण्यांत घेण्याची विनंती करतो. ग्राहक त्यास प्रतिसाद देतात. ही नाणी चलनात आहेत. ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही.
- प्रवीण नांदेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, देवगिरी नागरी सहकारी बँक
 
आमच्या एकाही शाखेत १० ची नाणी नाकारली जात नाहीत. जर कोणी यास नकार देत असेल तर त्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आमच्याकडे याबाबतची एकही तक्रार नाही.
- वरिष्ठ अधिकारी, एसबीआय
 
बँकांत १० रुपयांची नाणी वाढण्याची कारणे
देवगिरी नागरी सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर यांनी बँकेत १० रुपयांच्या नाण्यांची आवक वाढल्याची पुढील कारणे सांगितली आहेत -नाण्याचे डिझाइन बदलले. नवीन नाण्यावर रुपयाचे चिन्ह नाही. ही नाणी खोटी असल्याच्या अफवा पसरल्याने लोक घाबरले.
{ नोटाबंदीनंतर १० रुपयांची नाणी बंद होणार असल्याच्या अफवाही पसरल्या. सर्वसामान्य व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात नाणी बँकांत जमा केली.
{ नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहाराकडे लोक वळले. एटीएमचा वापर वाढला. मात्र, यातून नाणी बाहेर पडत नसल्याने जमा झालेली नाणी बँकांत साचत गेली.
{ आकार वजन अधिक असल्याने वॉलेटमध्ये ३-४ पेक्षा अधिक नाणे ठेवणे कठीण आहे. म्हणून नागरिकांना ती नकोशी वाटतात. ते बँकांकडून स्वीकारत नाहीत. ग्राहक स्वीकारत नाहीत, म्हणून विक्रेतेही नाणी घेत नाहीत.
{ १०० रुपयांची एक नोट किंवा १० रुपयांच्या १० नोटा बाळगणे १० रुपयांच्या १० नाण्यापेक्षा सोपे जाते. यामुळे विक्रेते, ग्राहक यास नकार देतात.
 
…तर देशद्रोहच
दहारुपयांचे नाणे ही राष्ट्रीय संपत्ती आहे. या नाण्याचे मूल्य धारकाला अदा करण्याचे वचन सरकार देते. नाणे स्वीकारल्याने भादंविच्या कलम १२४ अन्वये राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती अॅड.रेणुका घुले यांनी दिली. अशा प्रकारात दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा हाेऊ शकते, असे घुले म्हणाल्या.
 
अशी दाखल करा तक्रार
जवळच्या पोलिस ठाण्यात जा. जे नाणे नाकारले ते पोलिसांना दाखवा. ज्यांनी नाणे नाकारले त्यांचा तपशील द्या. आरबीआयचे परिपत्रक दाखवून हा देशद्रोहाचा प्रकार असल्याचे सांगा.एफआयआर दाखल करण्यासाठी आग्रह धरा.
 
बातम्या आणखी आहेत...