आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rural Police Held Campaign For Women Empowerment

दिव्य मराठी विशेष: ग्रामीण पोलिसांची महिला सक्षमीकरणासाठी मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिलांवर दिवसेंदिवस वाढत जाणारे अत्याचार आणि त्यांना नसलेली हक्क अधिकारांची माहिती, यामुळे त्यांना हक्क मिळवून घेण्यात येणाऱ्या अडचणी तसेच अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याची नसलेली मानसिकता... या सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्यासाठी ग्रामीण पोलिस दलातर्फे विशेष अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये महिलांसाठी ‘जागृती’ नावाचे पुस्तक आणि अॅप तयार करण्यात आले आहे. जागृती पुस्तकाची संकल्पना पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची असून पुस्तकाचे संपादन अपर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.

गेल्या वर्षात मुलींची आणि महिलांची छेड काढणाऱ्या १११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणांमध्ये लाख २९ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. काहींवर पहिलाच गुन्हा असल्यामुळे त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. मात्र, टवाळखोर तरुण आणि पुरुषांच्या त्रासाला वारंवार महिला-मुलींना सामोरे जावे लागत असल्याने त्यासाठी उपाययोजना म्हणून अॅप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

महिलांसाठी जानेवारीला या अॅपचे लोकार्पण करण्यात येणार असून त्यासोबत ‘जागृती’ नावाचे एक पुस्तक दिले जाणार आहे. या पुस्तकात महिलांविषयी कायदे, गुन्ह्यांची पद्धत, गुन्ह्यांचे प्रकार, सायबर क्राइम, गुन्हा कशा प्रकारे घडतो आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय या विषयीची माहिती अाहे. पुस्तक महाविद्यालयातील वाचनालये, बचत गट, महिलांविषयीच्या जागृती कार्यक्रमांत तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात वाटण्यात येणार असून त्यामध्ये पोलिस ठाण्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे आणि व्हॉट्सअॅप नंबरदेखील देण्यात आले आहेत.

‘जागृती’पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे : यापुस्तकात महिलांसंबंधीचे कायदे अटी-नियमांच्या माहितीबरोबरच हुंडाबंदी, अपहरण, विनयभंग, गर्भपात, बलात्कार, बालविवाह, अनैतिक व्यापार प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचार, तक्रार अर्ज कसा करावा, महिला सहायक कक्ष समितीची माहिती, माहिती तंत्रज्ञान कायदा (सायबर क्राइम), स्त्री भ्रूणहत्या, अपराधाचे स्वरूप, कलम आणि शिक्षेचे स्वरूप याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

महिलांविषयी अथवा तरुणींविषयीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये बऱ्याचदा भीतीमुळे गुन्हे दाखल केले जात नाहीत. यासाठी महाविद्यालयातील प्राचार्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर घेण्यात आले असून जर महिला-तरुणींची कोणी छेड काढल्याची अथवा त्यांना त्रास देत असल्याची तक्रार आली, तर लगेचच या पथकातर्फे विद्यार्थिनीची-महिलेची तोंडी तक्रार घेऊन पोलिस स्वत:हून फिर्याद देऊन आरोपींवर कारवाई केली जाईल. या पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक राजश्री गाडे, पोलिस नाईक दीपक बर्डे, महिला पोलिस कर्मचारी मंदाकिनी धुळे आणि पोलिस हवालदार बबन भालेराव यांचा समावेश आहे.

आज होणार लोकार्पण...
महिलांसाठीतयार करण्यात आलेले अॅप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार असून जागृतीचेदेखील प्रकाशन होणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता महिला जागृती मेळावा, पोलिस मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे लोकार्पण विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या हस्ते होणार आहे.

संपर्क क्रमांक
(व्हॉट्सअॅपनंबर : ९८८१९३२२२२ - ७७६८९३२२२२) (नियंत्रण कक्ष : ०२४०-२३८१६३३ - २३९२१५१) आणि (महिला हेल्पलाइन : ०२४०-२३९२१०० - ९७६३७७६६४४) हे आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील ३० ग्रामीण पोलिस ठाण्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.