औरंगाबाद - खासदार पुत्र ऋषिकेश खैरे यांना शिवसेनेचा कोणीही स्वेच्छा निधी देण्यास नकार देणार नाही; तरीही त्यांच्या वाॅर्डात भाजप नगरसेवक तथा उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या स्वेच्छा निधीतून खरेदी करण्यात आलेले ‘ट्री गार्ड’ लावण्यात आले आहेत. सेना नगरसेवक, आमदार, खासदारांना सोडून खैरंेनी भाजप नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीचे का बरे रोपण केले, हा प्रश्न नागरिक शिवसैनिकांना पडला आहे.
खैरे यांच्या समर्थनगर वाॅर्डात वृक्षारोपण करण्यात आले. त्यातील मसाप सभागृहाच्या बाजूला लावण्यात आलेल्या झाडांना गार्ड लावण्यात आले. त्यावर ‘उपमहापौर प्रमोद राठोड यांच्या स्वेच्छा निधीतून’ असे फलक लावण्यात आले आहेत. वाॅर्ड सेना नगरसेवकाचा, प्रमोद राठोड या वाॅर्डापासून कोसो दूर राहतात, तरीही त्यांचा स्वेच्छा निधी का वापरण्यात आला, असा प्रश्न नागरिकांनी केला.
अशा संस्थांना मदत करावी
^काही स्वयंसेवी संस्थांनी माझ्याकडे ट्री गार्डची मागणी केली होती. झाडे जगवण्यासाठी एखादी संस्था काम करत असेल तर आपण मदत केली पाहिजे. म्हणून मी माझ्या स्वेच्छा निधीतील गार्ड दिले. ते कोठे वापरले जाताहेत हे मला माहिती नव्हते. खैरेंच्या वाॅर्डात वापरली असतील तर त्यात गैर काय? प्रमोद राठोड, उपमहापौर
...म्हणून मी हस्तक्षेप केला नाही
^काही स्वयंसेवी संस्थांनी वाॅर्डात झाडे लावली. त्यासाठी त्यांनीच ट्री गार्डची व्यवस्था केल्याचे मला सांगण्यात आले होते. नंतर लक्षात आले की ते गार्ड प्रमोद राठोड यांच्याकडून घेण्यात आले आहेत. चांगले काम असल्यामुळे मी हस्तक्षेप केला नाही. झाडे जगवण्यासाठीही कोणीही झाडे ट्री गार्ड दिले तर स्वागतच आहे. ऋषिकेश खैरे, नगरसेवक