आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स. भु.त मनविसेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-महाविद्यालयात घेतल्या जात असलेल्या शिकवणीला विरोध करताना मनविसे कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले. एका गटाने महाविद्यालयात घुसून तोडफोड केली, तर दुसर्‍याने व्यवस्थापनाकडे घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मंगळवारच्या या प्रकाराने शहराच्या मध्यवस्तीतील सरस्वती भुवन महाविद्यालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कार्यकर्त्यांनी उपप्राचार्यांना घेराव घालून घोषणाबाजीही केली. शिकवणीचा फलक उखडून फेकला. तथापि, हे वर्ग शिकवणीचे नसून सीपीटीच्या पूर्वपरीक्षेसाठी असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

या महाविद्यालयात वर्षभरापासून खासगी शिकवणी सुरू आहे. यासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. पांडेज प्रोफेशनल अकॅडमीचे शिक्षक शिकवण्यासाठी येतात. यातून मिळणारे 70 टक्के उत्पन्न महाविद्यालयाला तर 30 टक्के कोचिंग क्लासला दिले जाते. शिकवणीतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत चांगले गुण मिळतात. सामान्य विद्यार्थी मात्र शिकवणी लावू शकत नसल्यामुळे त्यांची गुणवत्ता ढासळत आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तीन महिन्यांपूर्वी शिकवणी बंद करण्याची मागणी केली होती. या पूर्वीही आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला होता.
मनविसेचे पदाधिकारी महाविद्यालयातील पदाधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेले असता, सोबत पोलिस पाठवले होते. 30 डिसेंबरपर्यंत शिकवणीचे वर्ग बंद करू असे आश्वासन प्राचार्यांनी दिले होते. त्यांनी वर्ग बंद न केल्यामुळे आंदोलन करण्यात आल्याचे मनविसेचे शहर सचिव अक्षय खोबरे यांनी सांगितले. प्राचार्य उपस्थित नसल्याने उपप्राचार्यांना निवेदन दिले. दरम्यान आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. प्राचार्य आल्यानंतर चर्चा करू असे आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष वैभव मिटकर, अक्षय खोबरे, संकेत शेटे, राजू कांबळे, अरुण औताडे, मंगेश साळवे, शुभम दहीवाल, उमेश गवळी, भीमा धरमे, अविनाश दौड, गणेश ढगे, विशाल विराळे, मयूर वैष्णव यांचा सहभाग होता.

तीन महिन्यांपासून केवळ तारखा

तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. पोलिसांसमक्ष दिलेला शब्द व्यवस्थापनाने पाळला नाही. महाविद्यालयात सुरू असलेले खासगी कोचिंग क्लासेस बंद व्हावेत यावर आम्ही ठाम आहोत. वैभव मिटकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे

गैरसमजुतीतून प्रकार

मला प्राचार्य खैरनार सरांचा फोन आला. आमच्या कार्यकर्त्यांनी गैरसमजुतीतून आंदोलन केले. मी शहरात नसल्यामुळे हा प्रकार घडला. मी कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. सुमीत खांबेकर, शहराध्यक्ष, मनसे