आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sabhu Education, Cultural Program Was Organized On The Occasion Of The Organization's Centenary Festival

लोककलेतून घडले ग्रामीण संस्कृतीचे वैभवशाली दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स.भु. शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारूडरत्न निरंजन भाकरे यांचा "सोंगी भारूड दर्शन’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोककलेचे लेणे, ग्रामीण संस्कृतीचे वैभवशाली दर्शन प्रत्ययकारी प्रदर्शन कलाप्रेमींना अनुभवता आले.
वासुदेव, नंदीबैल, कुडमुड्या जोशी, बुरगुंडा अशा लोप पावत चाललेल्या लोककलांना संजीवनी देत त्यांनी लोकप्रबोधनाचा जागर आपल्या भारुडातून केला. "विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोवला’ या विठ्ठल नामस्मरणाने सुरू झालेला सोंगी भारुडाचा ठाव ‘चलो मच्छिंद्र गोरख आया’ या गोरखनाथांच्या भारुडापासून ‘तुज नमो नमो ओंकारस्वरूपा’, ‘शंभो महादेव’, ‘वासुदेव आला रं वासुदेव आला’, ‘तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा’ आणि ‘महादेवाचा नंदी आला हो सदाशिवाचा नंदी आला’ असा चौफेरपणे रसिकांची उत्स्फूर्त दाद घेत जनजागराच्या वाळवंटात स्थिरावला.
शिवसिंग राजपूत, गणेश फुसे, दादाराव तांगडे, विश्वनाथ शिरसाट, दत्तात्रय वराडे, शेखर भाकरे, विष्णू गोडबोले, चंद्रहार सुरडकर या कलावंतांनी साथसंगत केली. अनुराधा पिंगळीकर यांनी उत्कृष्ट निरूपण करीत भारुडातील आशय रसिक मनासमोर ताकदीने उभा केला.
याप्रसंगी संपतकाका गोर्डे, रामकृष्ण जोशी, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार, प्रा. दिनकर कोरान्ने यांची उपस्थिती होती. प्रा. चित्रा निलंगेकर, मेधा लक्षपती, विश्वनाथ दाशरथे, मंगेश कुलकर्णी, गजानन केचे, संगीता भाले, संध्या कानडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी परिचय करून दिला. डॉ. वीरा राठोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जगदीश माहोरकर यांनी आभार मानले.