आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात हजार 'लेखण्‍यांचा' धनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेख साबीर शेख अहमद हे जळगाव येथील महानगरपालिका शाळेत शिक्षक आहेत. त्यांना लहानपणापासूनच दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद होता. अध्यापनाचे कार्य करत असताना मुलांच्या हस्ताक्षराबाबत ते नेहमीच नाराज असायचे. मुलांनी अक्षर चांगले काढावे, असा त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. अशातच त्यांना लेखण्यांचा संग्रह करण्याची आवड निर्माण झाली. लहानपणी सुंदर लेखण्यांचे त्यांना खूप आकर्षण होते. आपल्याकडेही अशा भरपूर लेखण्या असाव्यात, असे त्यांना मनोमन वाटायचे. त्यादृष्टीने त्यांनी वाटचाल केली आणि यातूनच त्यांना देश-विदेशातील लेखण्या गोळा करण्याचा छंद जडला. 1982 ते आतापर्यंत त्यांनी तब्बल सात हजार लेखण्यांचा संग्रह केला आहे.

छंद जोपासणे व त्यात गुंतून जाण्याचे अनेकांना वेड असते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करण्याचादेखील अनेकांना छंद असतो. पुरातन वस्तू, नाणी, चित्रे, व्हिजिटिंग कार्ड्स, मूर्ती इत्यादींचा संग्रह करणारे आपण पाहिले. मात्र, एका अवलिया शिक्षकाने विविध प्रकारच्या हजारो लेखणींचा संग्रह केला आहे. जळगाव येथील शिक्षक साबीर शेख यांच्याकडे तब्बल सात हजारांपेक्षाही जास्त लेखण्या आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवण्याचीदेखील त्यांची इच्छा आहे.

लेखण्यांचा अनोखा संग्रह
शेख साबीर यांच्या खजिन्यातील माऊंट ब्लॅक हा पेन दोन हजार रुपये किमतीचा आहे. असे त्यांच्याकडे 140 पेन आहेत. याबरोबरच त्यांच्याकडे दुर्मिळ 195 शेफर पेन, 195 बेरियार कार्डिन, 200 वुडन पेन आहेत. तसेच 1 इंची पेन, अँम्बिशन, डेन्मार्क इत्यादी आकर्षक पेन आहेत. शाहरुख खानने बादशाह चित्रपटात वापरलेला एरियल पेनसारखा पेनदेखील त्यांच्याकडे आहे. तसेच मार्बल पेन, पार्कर पेन, सेंट बरी, राजस्थानी पेनांचाही संग्रह आहे. 50 वर्षांपूर्वीचा डायमीटर पेन सर्वांना आकर्षित करतो. पेनच्या वरच्या भागावर डायमीटर लावण्यात आले असून त्याला आठ आकडे देण्यात आले आहेत. गणितातील वर्तुळ, रेषा काढण्यासाठी याचा वापर होतो. त्यांच्या संग्रहातील विविध टॉइजच्या पेनांचा संग्रह आकर्षित करतो. यात गॉगल, की-चेन, तलवार, डॉल असे पेन मुंबई, पुणे, जळगाव येथून संग्रहित केले आहेत.

इतर वस्तूंचाही केला संग्रह
साबीर यांचे वडील शेख इमदाद यांनाही दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. त्यांनी गोळा केलेल्या वस्तू साबीर यांनी जतन करून ठेवल्या आहेत. इथेच न थांबता साबीर यांनी अमेरिका, इंग्लंड, जपान आणि भारतातील विविध ठिकाणांवरून साडेचार हजार आगपेट्या, पेन बॉक्स, दुर्मिळ तिकिटे, चांदी, तांबे व अँल्युमिनियमची देशी-विदेशी नाणी, विविध प्रकारचे 80 स्टोन, खेळण्या इत्यादींचा संग्रह केला आहे. विशेष म्हणजे शेख साबीर यांनी 1932 सालची आगपेटी आजही सांभाळून ठेवली आहे.

प्रदर्शनातून मिळाले प्रोत्साहन
साबीर शेख यांनी जळगावात दहा ते बारा वेळा लेखण्यांचे प्रदर्शन भरवले आहे. त्यांना नेपाळ येथील भारतीय समाज विकास अकादमीने गौरवले आहे. हॉबी क्लबशी जोडले गेल्यामुळे त्यातून दुर्मिळ वस्तू शोधण्यास प्रोत्साहन मिळाल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर त्यांची मुलगी शाजियादेखील या कामात त्यांना मदत करते.

काड्यापेट्यांचा संग्रह
साबीर शेख यांना लेखण्या जमवण्याचा छंद लहानपणापासूनच होता. हे करत असतानाच त्यांनी अमेरिका, इंग्लंड, जपान आणि भारतातील मिळून साडेचार हजार आगपेट्यांचा संग्रह केला आहे.

लिम्का बुकात नोंद करणार
मला लहानपणापासूनच विविध वस्तूंचा संग्रहर करण्याचा छंद आहे. त्यातही लेखण्यांचा संग्रह करायला खूप आवडते. यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. देश-विदेशातील लेखण्या जमवून त्याचा संग्रह केल्याचा मला अभिमान आहे.जळगावचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवण्याची माझी इच्छा आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, लेखणींचा अनोखा संग्रह...