आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधुग्रामकडे ‘कुमक’, शहर स्वच्छता धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याचा तिढा सुटत नसताना प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून तेथे महापालिकेचे सफाई कर्मचारी तैनात केल्यामुळे शहर स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आधीच पालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे अपुरे मनुष्यबळ असताना साधुग्रामसाठी अतिरिक्त कुमक दिल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात अस्वच्छता पसरल्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगत महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठेक्याच्या वादात शहराचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन तातडीने तोडगा काढा, असे साकडेही त्यांनी आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांना घातले आहे.

साधुग्रामच्या स्वच्छतेचा ठेका ‘वाॅटरग्रेस प्राॅडक्ट्स’ला डावलून दुसऱ्या क्रमांकावरील क्रिस्टील या कंपनीला स्थायी समितीने दिला. वाॅटरग्रेसकडे ९० लाख रुपयांची थकबाकी असल्याचे कारण देत त्यांची निवदिा रद्द करण्यात आली. यासंदर्भात उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत वाॅटरग्रेसला काम देण्याचा ठराव रद्द झाल्याचे सांगितले जाते. अर्थात, प्रशासनाने या महत्त्वाच्या मुद्यावर कोणताही जाहीर खुलासा दिलेला नाही न्यायालयाचे निकालपत्रही उपलब्ध झालेले नाही. दुसरीकडे, जुलैपासून साधुग्रामच्या स्वच्छतेचे काम सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, २० दिवस उलटूनही ठेक्याच्या वादामुळे येथे सफाई कर्मचाऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने उगाच वाद नको म्हणून महापालिकेच्याच सफाई कर्मचाऱ्यांना तेथे कामासाठी दोन शिफ्टमध्ये तैनात केले आहे.

मानधनावर भरतीसाठी नगरसेवक आक्रमक
मानधनावरतात्पुरती भरती करण्यासाठी नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्थायी समितीतील सर्वपक्षीय सदस्यांचा एक गट सक्रिय झाल्याचे समजते. मेहतर-मेघवाळ समाज संघटनेने मानधनावर काम करण्याची तयारी दाखवली होती. स्थायी समितीचा ठरावही महासभेवर पाठवला होता. त्यावर निर्णयासाठी दबाव आणला जाऊ शकतो.

तातडीने तोडगा गरजेचा
साधुग्राम मधील स्वच्छतेविषयी तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. पालिकेचे कर्मचारी तिकडे वळवल्यामुळे शहर स्वच्छतेत अडचणी येत आहेत. काम कोणालाही मिळो मात्र, तातडीने काही तरी पर्याय दिला पाहिजे.- अशोकमुर्तडक, महापौर