अकलूज- शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी राबवलेली धोरणे हेच पांडुरंग कारखान्याच्या यशाचे प्रमुख कारण आहे असे या कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले. राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पांडुरंग कारखान्याला राज्य सरकारचा सहकार भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ५१ हजार रोख, प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आगाशे उद्योगसमूहाचा आजारी असलेला खासगी साखर कारखाना घेऊन सुधाकर परिचरकांनी तो सहकारी केला. स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराच्या जोरावर आज पांडुरंग कारखान्याने राज्यातच नव्हे तर देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. कारखान्याचे सर्व ऊस उत्पादक सभासद त्यांच्या कार्यशैलीवर समाधानी आहेत. सर्वात जास्तीचा ऊसदर देऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. ऊस गाळपातून साखर निर्मिती यावरच थांबता सामाजिक बांधिलकी जपण्याचेही काम केल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. गतवर्षीच्या गळीत हंगामात ऊसटंचाई असतानाही पांडुरंग साखर कारखान्याने साडेचार लाख टन उसाचे गाळप केले यावरून कारखान्यावर ऊस उत्पादकांचा विश्वास असल्याचे सिद्ध होते.
यापूर्वी पांडुरंग कारखान्याला देश राज्य पातळीवरील २७ पुरस्कार मिळाले आहेत. सहकार भूषण हा २८ वा पुरस्कार आहे. २०१५-१६ च्या गळीत हंगामात पांडुरंग साखर कारखान्याने उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, विना अडथळा गाळप, दर्जेदार साखरेचे उत्पादन, सहावीजनिर्मिती प्रकल्पातून चांगली वीजनिर्मिती विक्री,अासवनी प्रकल्पातून दर्जेदार उत्पादने ,चांगला साखर उतारा ठेवून हंगाम पार पाडला होता. महत्त्वाचे म्हणजे आपल्या उस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जास्त ऊसदर दिला होता. कारखान्याच्या या सर्वांगीण प्रगतीचा आलेख पाहून हा पुरस्कार जाहीर झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.कारखाना ऊस उत्पादकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे.
हे संयुक्त यश
राजकारणासाठीनव्हे तर शेतकरी बांधवांच्या हितासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी कारखाना चालवतो. त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी कार्य राहिले आहेे. संचालक, सभासद, अधिकारी कर्मचारी यांचे हे संयुक्त यश असल्याचे सुधाकर परिचारक यांनी म्हटले.