आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 देशांमध्ये साईपादुका रथ, जागतिक पातळीवर साजरा होणार साई समाधी सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबा समाधी शताब्दी सोहळा जागतिक पातळीवर सातासमुद्रापार साजरा करण्याचे नियोजन साई संस्थानने केले आहे.  साईंच्या श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देशोदेशी पोहाेचवण्यासाठी पन्नास देशांमध्ये साई पादुका असलेला साई रथ साई संस्थान घेऊन जाणार असल्याची माहिती साईबाबा संस्थान विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी  पत्रकारांना दिली.   
 
साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या नियोजनावर आज मंगळवारी  संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात   माहिती देताना डॉ.हावरे यांनी सांगितले की, साई संस्थानच्या माध्यमातून शिर्डीमध्ये  अांतरराष्ट्रीय दर्जाची  साई आयएएस अॅकॅडमीची निर्मिती येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार  आहे. त्यासाठी निवृत्त आयएएस सुधीर ठाकरे यांची गव्हर्निंग कौन्सिल या पदावर नेमणूक करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. या अकादमीमध्ये राज्याच्या ग्रामीण भागातील दलित,आदिवासी व शेतकरी कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
 
साई समाधी शताब्दी सोहळ्याचा जगभर व देशाच्या विविध राज्यांत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रसार भारतीसोबत करार करण्यात येणार आहे. कर्करोग पीडित रुग्णांच्या उपचारासाठी सव्वाशे कोटी रुपये खर्च करून १०० बेडचे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी लवकरच साई संस्थान करणार आहे. त्यासाठी मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलची मदत घेतली जाणार आहे.   
 
येत्या गुरुपाैर्णिमेच्या उत्सवापासून साईंच्या दानपेटीत पंचवीस हजाराहून अधिक दान देणाऱ्या  देणगीदार भाविकांसाठी वीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पादुका भेट म्हणुन देण्यात येणार आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या  निळवंडे कॅनॉलच्या कामासाठी कर्जाऊ स्वरूपात सरकारला पाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे. या वेळी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल,उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम,विश्वस्त सचिन तांबे,मोहन जयकर,भाउसाहेब वाकचौरे,योगिता शेळके आदी उपस्थित होते.   

शिर्डीचे सुशोभीकरण
साई भक्तांना साईचरित्रातील विविध प्रसंग तैलचित्राद्वारे  समजावे यासाठी साई सृष्टी प्रकल्पाचे कामही येत्या १ऑक्टोबर पासुन सुरू करण्यात येणार आहे.शिर्डी-नाशिक,शिर्डी-नगर,शिर्डी -कोपरगाव या मार्गावर शिर्डीच्या परिसरात साई संस्थान एक लाख वृक्षांची लागवड करणार आहे.   शिर्डीत अत्याधुनिक बसस्थानाकाची निर्मिती करण्यात आली  आहे.  येथे सर्व साई साहित्य उपलब्ध असेल. तसेच वाहन पार्किंगचीही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असेल
बातम्या आणखी आहेत...