आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदळाच्या 65 लाख दाण्यांवर लिहिणार साईचरित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शीखधर्मीयांचा पवित्र ग्रंथ श्री गुरुग्रंथसाहिब तांदळावर साकारणार्‍या औरंगाबादच्या गजेंद्र वाढोणकर यांनी आता तांदूळ, तीळ आणि मोहरीवर श्री साईचरित्र साकारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. 60 ते 65 लाख दाण्यांवर साईचरित्र लिहिले जाणार असून पुढील वर्षापर्यंत हा अनोखा ग्रंथ तयार होणार आहे. दुसरीकडे, तांदळावरील श्री गुरुग्रंथसाहिबची गिनीज बुकात नोंद व्हावी यासाठी प्रयत्नांना वेग आला आहे.
दोन वर्षांपूर्वी गजेंद्र वाढोणकर यांनी श्री गुरुग्रंथसाहिब या 1430 पानांच्या पवित्र ग्रंथाचा सारांश असलेला ‘सुखमणी साहिब’ हा 240 पानी ग्रंथ अथक मेहनतीतून साकारला. त्यासाठी त्यांनी तांदळाचे 2472 दाणे वापरले. झीरो नंबरचा खास तयार करून घेतलेला ब्रश आणि वॉटर कलर यांचा वापर करून त्यांनी हा ग्रंथ सिद्ध केला. त्यात शीखधर्मीयांचे दहा गुरू आणि सुवर्णमंदिराचे चित्रही त्यांनी तांदळांवर रेखाटले आहे. या त्यांच्या कलाकृतीचे राष्ट्रपतींसह शीख समुदायाने उदंड कौतुक केले. या अनोख्या कलाकृतीची गिनीज बुकात नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील शीख बांधवांना ही कलाकृती पाहता यावी यासाठी त्यांनी देशोदेशीचा दौराही केला आहे. मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया या पूर्वेकडील देशांतील दीडशेहून अधिक गुरुद्वारांमध्ये त्यांनी नुकत्याच आपल्या या कलाकृती तेथील रहिवाशांसाठी नेल्या होत्या.
आपल्या आगामी प्रकल्पाबाबत ‘दिव्य मराठी’शी बोलताना वाढोणकर म्हणाले की, 758 पानी साईचरित्र तांदूळ, तीळ आणि मोहरीच्या दाण्यांवर साकारले जाणार आहे. यासाठी किमान 60 ते 65 लाख दाणे लागणार आहेत. एकूण 53 अध्याय असणार्‍या या ग्रंथात साईलीला, साईस्तवन यांचाही समावेश असेल. तसेच साईबाबांची चित्रे, साईंच्या जीवनातील अनेक प्रसंगांची रेखाटने असणार आहेत.
वाढोणकर म्हणाले, सहा वर्षांपासून ही कला जोपासली आहे. श्री गुरुग्रंथसाहिबमुळे देशभर आणि जगात जेथे जाईन तेथे या कलेचे कौतुक झाले. पण मराठवाड्यात हवी तशी दखल घेतली गेली नाही याचे वाईट वाटते. माजी खासदार उत्तमसिंह पवार, पुखराज पगारिया यांच्या प्रोत्साहनामुळे साईचरित्राचा प्रकल्प पूर्ण करणार आहे.