आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'साई के रहस्य\':रेल्वेतील भिकारी चित्रपटात ‘साईबाबा’; तरी भीक मागणे सुरुच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘सबका मालिक एक’ची शिकवण देणारे शिर्डीचे साईबाबा म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान.श्रीमंत असो वा गरीब, त्यांच्यासमोर सगळेच सारखे. साईबाबांचा सहवास लाभलेले पुण्यवान आता नाहीत. औरंगाबाद-मनमाड रेल्वेमार्गावर तुम्हाला साईबाबांचे दर्शन झाले तर क्षणभर थांबा. कारण हे आपले श्रद्धास्थान असलेले साईबाबा नाहीत. हा आहे भिकारी. कदाचित पूर्वपुण्याई म्हणून की काय, हा भिकारी दिसतो-राहतो साईबाबांसारखा. विशेष म्हणजे त्याने ‘साई के रहस्य’ या चित्रपटात साईबाबांची भूमिकाही केली आहे.

आजही तो याच रेल्वेमार्गावर ‘गरीब को दान दे दो बाबा’असे म्हणत तुमच्यासमोर हात पसरताना दिसून येईल. त्याच्या हातावर तुम्ही जर एक -दोन रुपयाचे नाणे ठेवले तर लगेच तो तुम्हाला ‘अल्ला बडा बादशहा’ म्हणून आशीर्वादही देईन आणि लगेच पुढच्या ‘शिकारी’ला निघून जाईन.


औरंगाबादसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 2 ऑगस्ट रोजी ‘साई के रहस्य’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. यात साईबाबांची भूमिका साकारणार्‍या अशोक बागूल या भिकार्‍याची निवड कशी झाली त्याचा हा किस्सा.

चित्रपटाचे निर्माते कैलास पवार यांना साईबाबांसारखा हुबेहूब चेहरा दिसणारा अभिनेता हवा होता. त्यासाठी त्यांनी ऑडिशन्सही घेतल्या, पण त्यांच्या मनासारखा ‘चेहरा’ त्यांना मिळाला नाही. चित्रपटात साक्षात सार्इंचे दर्शन झाल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण व्हावी, असा त्यांचा प्रयत्न होता, पण प्रयत्न करूनही अपेक्षित ‘चेहरा’ मिळत नसल्यामुळे ते कमालीचे हताश झाले होते. पुणे, कोल्हापुरासह राज्यातील प्रमुख शहरात ऑडिशन घेऊन ते औरंगाबादला परतले. येथील ऑडिशनमध्येही अपेक्षित चेहरा मिळत नसल्यामुळे रात्री मुंबईला जाण्यासाठी औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर आले. आणि तेथेच एका भिकार्‍यात त्यांना साई दिसला. तोच अशोक बागूल नावाचा भिकारी आज ‘साई के रहस्य’या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकतो आहे. ऑगस्ट महिनाअखेरीस हा चित्रपट देशभरातील मल्टिप्लेक्समध्ये झळकणार आहे.

चित्रीकरणासाठी या साईला शिर्डी, अजमेर, नोएडा आदी ठिकाणी घेऊन जावे लागले. सोबत असलेल्या टीममधील लोकांना चकवा देऊन हा ‘साई’ रेल्वेतच भीक मागून पाचपन्नास रुपये सहज गोळा करून आणायचा. निर्माते आणि त्यांच्या टीमने लाख विनंत्या केल्या, पण चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत तरी त्याची भीक मागण्याची सवय सुटू शकली नाही. एवढेच नव्हे शुक्रवारी (2 ऑगस्ट) हा चित्रपट प्रदर्शित झाला तरीही त्याचे भीक मागणे अजून थांबलेले नाही.

...आणि साई गवसला
‘साई के रहस्य’ हा चित्रपट वास्तवदर्शी व्हावा म्हणून साईबाबांसारख्याच चेहर्‍याचा शोध घेऊनही तो सापडत नसल्यामुळे हताश झालेले निर्माते कैलाश पवार मुंबईतच असा चेहरा मिळेल या अपेक्षेने मुंबईला जाण्यासाठी औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले. रेल्वे उशिराने येणार होती. स्टेशनवरच्या गर्दीत पवार यांचे मित्र विठ्ठल कांबळे यांची नजर एका भिकार्‍यावर पडली. पांढरी दाढी, साईबाबांसारखेच डोक्याला बांधलेले फडके आणि हातात कटोरा घेऊन तो त्यांच्याच दिशेने येत होता. कांबळे पवारांना म्हणाले ‘साक्षात साई तुमच्यासमोर उभा आहे’. येथेच साई गवसला आणि हव्या त्या चेहर्‍याचा शोध थांबला.

अनंत अडचणी
बागूलला सांभाळता सांभाळता निर्मात्याच्या अक्षरश: नाकीनऊ आले. चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण झाल्यानंतर तो मध्येच गायब झाला आणि निर्मात्याला घाम फुटला. औरंगाबादपासून मनमाड, मुंबई, पुणे आदी रेल्वेस्टेशनवर त्याची शोधाशोध सुरू केली. नवा चेहरा घेऊन पुन्हा चित्रीकरण करणे परवडणारे नव्हते म्हणून ही धडपड होती. 22 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर तो मनमाड स्टेशनवर रात्री 3 वाजता एका कोपर्‍यात झोपलेला आढळला.