आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावच्या धर्तीवर शिर्डीत 29 जुलैपासून ‘साई सेवक’; भाविकांना माेफत सेवा देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - श्रीक्षेत्र शेगावच्या धर्तीवर शिर्डीतही २९ जुलैपासून साई सेवक योजना सुरू होत आहे. पदयात्री साई पालख्यांच्या प्रतिनिधींच्या श्रीसाई सेवक संमेलनात या योजनेसाठी ५३२ गटांनी नावनोंदणी केली. साई सेवकांनी साईभक्त हा भगवंताचे रूप समजून त्याची सेवा करावी, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी  केले. शिर्डी येथील सिद्ध संकल्प मॅरेज हॉलमध्ये बुधवारी झालेल्या श्रीसाई सेवक संमेलनात ते बोलत होते.

संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले, नगराध्यक्षा योगिता शेळके, कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. हावरे म्हणाले, शेगावमध्ये अनेक सेवेकरी भाविकांना विनाशुल्क सेवा देत असतात. त्याच धर्तीवर अाता शिर्डीतही साई सेवक योजना राबवण्यात येईल. साईबाबांच्या मंदिरात सेवाभाव वाढवणे व भक्तांना सेवाभावी वागणूक मिळण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. पालखीबरोबर येणाऱ्या पदयात्री भाविकांना साई सेवक हा सन्मान देऊन साईंची सेवा करण्याची संधी या माध्यमातून दिली जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अधिकारी अग्रवाल यांनी केले, तर आभार उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर यांनी मानले.

२१ साई सेवकांचा एक गट
शिर्डीत साई सेवकांचा २१ व्यक्तींचा गट तयार करण्यात आला असून रविवार ते शनिवार एक गट काम करेल. एका आठवड्यात सकाळी ६ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री १० या वेळेत प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा गटांतून २१० साई सेवक आठवडाभर सेवा देतील. ही योजना २९ जुलैपासून सुरू करण्यात येईल. या गटांना मंदिर, प्रसादालय, हॉस्पिटल व निवासस्थाने येथे वर्षातून सलग सात दिवस साईसेवेची संधी दिली जाईल. साई सेवकांनी ‘ओम साई राम’ म्हणून साईभक्तांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. या साई सेवकांना ओळखपत्र, गणवेश देऊन त्यांची संस्थानच्या वतीने निवास, भोजन, नाष्टा व चहापाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येईल. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या साई सेवकांनी स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून त्यांना व्यसनमुक्तीची शपथही दिली जाईल. प्रातिनिधिक स्वरूपात पाच साई सेवकांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.  
बातम्या आणखी आहेत...