आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saint Eknath Cooperative Sugar Factory News In Marathi, Paithan, Divya Marathi

‘संत एकनाथ’चे नाव बदलण्याचा घाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. पुण्यातील एका सीएने (चार्टर्ड अकाउंटंट) कारखाना चालवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, कारखान्यास त्याचे नाव देण्याची अट घातली आहे. या अटीमुळे कारखाना सुरू झाल्यास ‘संत एकनाथ’ऐवजी त्या सीएचे नाव कारखान्यास दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारखान्याचे नाव बदलण्याचा घाट घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कारखाना बचाव कृती समितीने दिला आहे.

शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांच्या नावाने हा कारखाना ओळखला जातो. कारखान्यामुळे पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांची मोठी गैरसोय दूर झालेली आहे. परंतु संचालक मंडळाचे दुर्लक्षामुळे सध्या या कारखान्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून हा कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतक-यांच्या उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यात कारखाना असूनही शेतक-यांना अन्य कारखान्यांना ऊस घालावा लागत आहे.
सध्या हा कारखाना चालवण्यास कोणीही पुढे येत नाही, त्यामुळे संचालकांनी पुणे येथील एका सीए असलेल्या व्यक्तीस कारखाना चालवण्यास देण्याची तयारी दर्शवली आहे. त्याचे नाव दिल्यानंतर करार होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

नावावरून राजकारण
सीएने थेट करार होण्यापूर्वीच कारखान्याच्या नावाऐवजी स्वत:चे नाव लावण्याचा हट्ट धरला असल्याची चर्चा आहे. ‘एकनाथ’चे नाव बदलण्यावरून येणा-या काळात चांगलेच राजकारण रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारखाना बचाव समितीचे निमंत्रक जयाजी सूर्यवंशी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय जाधव यांनी कारखान्याचे नाव बदलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.