आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saint Eknath Sugar Factory Starts Say Gopinath Munde

‘संत एकनाथ साखर कारखान्या’चा बॉयलर गोपीनाथ मुंडे पेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा चालवण्यास खासदार गोपीनाथ मुंडे तयार झाले आहेत. त्यामुळे यंदाही कारखान्याचा बॉयलर पेटणार असल्याने शेतक-यांसह कामगारांच्या चेह-यावर आनंद दिसत आहे.


संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यंदा सुरू करण्यासाठी संचालक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करत होते. त्यांनी अनेक साखरसम्राट व पुढा-यांच्या भेटीगाठी घेऊन संत एकनाथ कारखाना चालवण्यास घ्या, अशा विनवण्या केल्या. मात्र, त्यांच्या हाती केवळ जयंत पाटीलच लागले. त्यांच्या कारखान्याच्या पदाधिका-यांनी या कारखान्याची काही दिवसांपूर्वीच पाहणी केली. मात्र, कारखाना चालवण्यास घ्यायचा की नाही यासंदर्भातील निर्णय तुम्हाला फोनद्वारे कळवू, असे संचालक मंडळाला सांगितले. मात्र, त्यांचा फोनच अद्यापही न आल्याने कारखान्याचे चेअरमन संदिपान भुमरे यांनी जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना पुढे करत गोपीनाथ मुंडे यांनीच कारखाना चालवण्यास घ्यावा, अशी विनवणी केली. त्यामुळे दानवे यांच्यामुळे मुंडे हे संत एकनाथ चालवण्यास तयार झाले असल्याचे संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून सहा वर्षे पैठणचा संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चालवला. या काळात त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी व ऊसतोड कामगार आणि कारखान्यात काम करणारे कामगार यांचे वेतन, बिले वेळेवर अदा केली होती. त्यांच्यासोबतचा करार संपल्याने त्यांनी हा कारखाना चालवण्यास असमर्थता दर्शवली होती. यासंदर्भात संचालक मंडळालाही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता हा कारखाना कोण चालवण्यास घेणार, यासाठी संचालक मंडळाची शोधशोध सुरू झाली. मात्र, सर्वत्र शोधाशोध करून अनेकांनी कारखाना चालवण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे यंदा कारखाना बंद राहतो की काय, अशी धास्ती चेअरमन भुमरे यांना होती. कारण काही महिन्यांनंतर पुन्हा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे भुमरे हे पुन्हा आमदार होण्यासाठी शेतक-यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळत आहेत. कारखाना सुरू झाला नाही तर येत्या निवडणुकीत मतदार आपल्याकडे पाठ फिरवतील अशी भीती वाटू लागली. त्यामुळे भुमरे यांनी कारखाना सुरू करण्यासाठी शेवटी खासदार रावसाहेब दानवे यांना पुढे करत गोपीनाथ मुंडे यांना पैठण तालुक्यात असलेले भाजप व शिवसेनेचे वर्चस्व यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे मुंडे कारखाना चालवण्यास तयार झाले आहेत. दस-यानंतर हा कारखाना सुरू होण्याची शक्यता आहे.


होकार मिळाला नाही
जयंत पाटील यांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ‘संत एकनाथ’ची पाहणी केली. मात्र, सहा दिवस उलटले तरी अद्यापही यासंदर्भात त्या कारखान्याच्या संचालक मंडळाकडून काहीच प्रतिसाद आला नाही. विशेषत: जयंत पाटील हे राष्‍ट्रवादीचे आहेत, तर ‘संत एकनाथ’वर सेनेच्या पदाधिका-यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांनी हा कारखाना चालवण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे सूत्रांकडून समजते.


४संत एकनाथ सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे यासाठी गोपीनाथ मुंडे यांना तुम्हीच कारखाना चालवण्यास घ्यावा, अशी विनंती केली. त्यामुळे ते कारखाना चालवण्यास तयार झाले असून लवकरच कारखाना सुरू होईल. संदिपान भुमरे, चेअरमन, संत एकनाथ साखर कारखाना, पैठण