आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचारवंतांपेक्षा आज आचारवंतांची गरज, संत साहित्याचे अभ्यासक अशोक कामत यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जीवनाकडे बघण्याची तटस्थता संतांनी दिली. संतांनी तत्त्व जगून दाखवले. समाजात मूल्यशिक्षणाची खरी गरज आहे. संतांच्या काव्याकडे पाहण्यापेक्षा त्यांच्या कार्याकडे पाहण्याची खरी गरज आहे. संतांच्या विचारांपेक्षा त्यांचे आचरण समाजाला खूप काही शिकवून गेले आहे. त्यामुळे आजच्या काळात विचारवंतांपेक्षा आचारवंतांची खरी गरज असल्याचे मत ज्येष्ठ संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी केले.
शिवछत्रपती महाविद्यालयाच्या वतीने आयोजित दोनदिवसीय व्याख्यानमालेत "आजचे शिक्षण संत साहित्य' या विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ. कामत म्हणाले, सध्याच्या शिक्षण पद्धतीत नैतिकता, मूल्ये, गुणसंपदा हरवलेली दिसत आहेत. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालाय. त्यामुळे सध्याच्या शैक्षणिक पद्धतीत नैतिकता, मूल्ये आणायची असल्यास त्यात संत साहित्याचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्राला लाभलेल्या महान संत परंपरेचा आदर्श घेऊन देशाच्या उभारणीसाठी कटिबद्ध असले पाहिजे. शैक्षणिक पद्धतीवर टीका करताना म्हणाले, विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभा राहील, अशी सोय शिक्षण पद्धतीमध्ये नाही. संत साहित्याला शासनाने संरक्षण देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर, विद्यापीठाच्या जनसंवाद वृत्तपत्रविद्या विभागाचे डॉ. वि. ल. धारूरकर, प्राचार्य डॉ. पी. व्ही. आष्टेकर यांची उपस्थिती होती. शिक्षणात मुल्य शिक्षणाची मोठी समस्या आहे. सामर्थ्यशाली देश घडवण्याची शक्ती संतांनी दिली. त्यामुळे शिक्षणपध्दतीत मुल्यशिक्षणाचा समावेश असणे गरजेचे असल्याचे मत उदघाटनप्रसंगी धारुरकर यांनी व्यक्त केली. प्रा. भरत वहाटुळे, एस. एस. बागडे, संजय राऊत राकेश खैरनार यांची उपस्थिती होती. डॉ. वैजीनाथ कदम यांनी सूत्रसंचालन केले.
अभ्यास केंद्र उभारा
शिक्षणपद्धतीमध्ये मूल्ये शिकवली जात नाहीत. मातृभाषेला महत्त्व दिले पाहिजे. प्रत्येक महाविद्यालयात, विद्यापीठात संत साहित्य अभ्यास केंद्र स्थापन केले गेले पाहिजे, असे कामत म्हणाले.