आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलीम अली सरोवराची वाताहत; निधी ‘पाण्यात’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ऐतिहासिक सलीम अली सरोवराची वाताहत झाली आहे. व्हीआयपी रोडवरील सरोवरातील साहित्य चोरीला गेले असून तेथील विद्युत दिवे तुटले आहेत. छत्र्यादेखील मोडल्या आहेत. नागरिकांना उपलब्ध करून दिलेला जॉगिंग ट्रॅक कचऱ्याने वेढला आहे. परिणामी विकासावर लाखो रुपये खर्चूनही सरोवर भकास झाले आहे.
मलिक अंबरने सलीम अली सरोवराची निर्मिती केली होती. सर्वात मोठे असे हे सरोवर औरंगजेबाच्या काळात अर्धे बुजवण्यात आले आणि त्या ठिकाणी हिमायतबागेची निर्मिती करण्यात आली. बाग आणि सरोवर यांच्यामध्ये रस्ता तयार झाला. त्याला व्हीआयपी रोड असे संबोधले जाते.

याच रस्त्याच्या कडेला असलेले सलीम अली सरोवर बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. अंजिठा लेणीकडे जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसाठी हे सरोवर आकर्षणाचे केंद्र आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सरोवराला कुंपण केले आहे. त्यामुळे पर्यटक सरोवर पाहण्यापासून वंचित राहत आहेत.

जाॅगिंग ट्रॅकची कचराकुंडी
अर्धाकिलोमीटरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे, परंतु हा ट्रॅक आता नावालाच राहिला असून त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संपूर्ण ट्रॅकवर झाडे, प्लास्टिक बाटल्यांचा खच आहे.

विद्युत दिवे बंद
सरोवरपरिसरात लावलेले विद्युत दिवे बंद पडले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार पसरतो. त्याचा फायदा मद्यपी घेत असून दररोज रात्री दारूच्या पार्ट्या होतात. तसेच परिसरात लावण्यात आलेल्या छत्र्यादेखील तुटल्या आहेत.

मनपाने लक्ष द्यावे
आम्ही या भागातील नागरिक आहोत. सकाळी येथे व्यायाम करण्यासाठी दररोज येत असतो, परंतु या ऐतिहासिक सरोवराकडे कुणाचेच लक्ष नाही. सर्वत्र घाण पसरली आहे. मनपाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सलीम शेख, रहिवासी