आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सलीम अली’चे काम अंतिम टप्प्यात; महिनाभरात उद्यान होणार खुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सलीम अली सरोवराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण होत आले असून पक्षी निरीक्षणासाठी टॉवर आणि नयनरम्य देखावा पाहण्यासाठी येत्या महिनाभरात हा परिसर नागरिकांसाठी खुला होणार आहे. दरम्यान, न्यायालयाचा आदेश डावलून सुशोभीकरण होत असल्याबाबत सलीम अली सरोवर बचाव समितीने संताप व्यक्त करत ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पुण्याच्या राजकोंडवार एजन्सीने काम केले असून त्यातून पक्षी निरीक्षणासाठी एक टॉवर उभारण्यात आला आहे. फुटपाथ बांधण्यात आले. पेव्हर ब्लॉकऐवजी काँक्रीट प्लेटसचा वापर करण्यात आला आहे. तसेच तलावातील गाळही काढण्यात आला आहे. काम 15 दिवसांत पूर्ण होणार असून, प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. उद्यान प्रवेश शुल्क आकारले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले. सरोवरात बोटिंग न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, साधारणपणे सगळी कामे येत्या महिनाभरात पूर्ण केली जातील आणि जानेवारीमध्ये उद्यान खुले होईल.

सरोवर बचाव समितीचा विरोध
सरोवराचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असताना सलीम अली सरोवर बचाव समितीने कामाला विरोध दर्शवला आहे. समितीचे डॉ. किशोर पाठक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, सरोवरासंदर्भातील प्रकरणात न्यायालयाने कोणत्याही सुशोभीकरणाला अथवा वृक्षतोडीला स्थगिती दिली असूनही येथे फुटपाथला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. तसेच येथील झाडांच्या फांद्या, बाभूळबनातील काही झाडे तोडण्यात येत आहेत. 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत खंडपीठाने दिलेला स्थगनादेश जारी ठेवलेला असूनही कामे सुरू आहेत. या कामाबाबत न्यायालयाला अवगत केले जाईल, असे संकेत त्यांनी दिले.