आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपॉइंटमेंट देऊनही उपायुक्त गैरहजर, बंद दरवाजाच्या कडीला टांगले निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सलीम अली सरोवराच्या परिसरात बाभूळबन तोडून तिथे जपानी उद्यान उभारण्याचा उद्योग तेथील जैवविविधतेच्या मुळावर येणार असून सर्व तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय होईपर्यंत सध्या सुरू असलेल्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा उपमहापौर संजय जोशी यांनी केली आहे. या जपानी उद्यानाच्या विरोधात शुक्रवारी डॉ. सलीम अली सरोवर संवर्धन समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले.

राज्य सरकार आणि मनपाच्या वतीने सलीम अली सरोवराच्या परिसरात जॅपनीज गार्डन आणि रोज गार्डन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या साठी निधीचीही तरतूद करण्यात आली. या नव्या रूपातील सरोवरामुळे पक्ष्यांचे आर्शयस्थान धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील एकमेव पाणथळ तलाव असलेले सरोवर हे पक्ष्यांचे आर्शयस्थान आहे. तेथील पाणथळ, जलपर्णी, बाभूळबन या पक्ष्यांच्या अधिवासासाठी सोयीस्कर आहेत. या सरोवरात देश-विदेशातील 62 जातींचे पक्षी आर्शयाला येत असतात.

जपानी गार्डनच्या नावाखाली बाभूळबन, जलपर्णी तोडण्यात येणार आहेत. असे केल्यास पक्ष्यांचा आसरा नाहिसा होईल. तसेच या सरोवरात बोटिंग सुरू केले जाणार असल्याने मोठा धोका उत्पन्न होईल असा या समितीच्या सदस्यांचा आक्षेप आहे. या समितीने गेल्या महिन्यात बैठक घेऊन मनपा आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कालच मनपाचे उपायुक्त सुरेश पेडगावकर यांची त्यांनी रीतसर अपॉइंटमेंट घेतली होती. उपायुक्तांची दांडी अन् कडीला निवेदन : सकाळी अकरा वाजता भेटण्याची वेळ पेडगावकर यांनी दिली होती. त्यानुसार समितीचे सदस्य ज्येष्ठ पक्षी निरीक्षक निर्मलदादा, राजेंद्र धोंगडे, अरविंद पुजारी, अमर परदेशी, डॉ. किशोर पाठक, निशिकांत भालेराव, डॉ. विवेक घारपुरे, मिलिंद गिरधारी, पंकज शक्करवार मनपामध्ये आले. उपायुक्त पेडगावकर यांचा पत्ताच नव्हता. साडेअकरा वाजता त्यांना फोन केला असता त्यांनी दहा मिनिटांत येतो असे सांगितले, पण बारा वाजेपर्यंत ते न आल्याने अखेर त्यांच्या दालनाच्या कडीला निवेदन देण्यात आले.

उपमहापौरांनी घेतले निवेदन :

समितीचे सदस्य आल्याचे आणि त्यांना कोणीही भेटत नसल्याचे कळल्यावर उपमहापौर संजय जोशी मनपात आले. त्यांनी सदस्यांना आपल्या दालनात बोलावून घेऊन निवेदन स्वीकारले. निर्मलदादा, अमर परदेशी, डॉ. किशोर पाठक, राजेंद्र धोंगडे यांनी उपमहापौरांना सरोवराचे जैवविविधतेच्या बाबतीत असलेले महत्त्व सांगितले व तो वाचवणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

मनपाची जबाबदारी : निशिकांत भालेराव व राजेंद्र धोंगडे यांनी सांगितले की, जैवविविधता कायदा 2002नुसार मनपा हद्दीतील जैवविविधतेचे रक्षण करण्याची जबाबदारी मनपाची आहे. या बाबत केंद्र आणि राज्य सरकारचे नियम असून त्यानुसार जैवविविधता संवर्धनासाठी समिती स्थापन करून त्यानुसार आराखडा बनवणे, तज्ज्ञांची मदत घेणे अनिवार्य आहे.

लवकरच होणार निर्णय

सर्वांचे म्हणणे ऐकून उपमहापौर संजय जोशी यांनी सरोवराच्या परिसरात सुरू असलेले काम तत्काळ थांबवले जाईल, असे सांगितले. दोन दिवसांत या विषयाची संपूर्ण माहिती करून घेऊन एक बैठक बोलावली जाईल व सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

काय आहे जॅपनीज गार्डन

0 सलीम अली सरोवराच्या बाजूला असलेल्या आठ एकरांत जॅपनीज गार्डन, रोज गार्डन उभारणार.

0 सरोवरात बोटिंगची सोय असणार. त्यासाठी तिकीट आकारण्यात येणार आहे.

0 सरोवराच्या उत्तर बाजूस ज्ॉपनीज गार्डन विकसित करण्यासाठी 1 कोटीचा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या फंडातून उपलब्ध करून देणार. उर्वरित खर्च मनपा करणार