आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोंढ्यात मिठाची लुटालूट, मीठ संपल्याची अफवा पसरल्यानंतर किमती अचानक वाढल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशाच्या अनेक राज्यांत मीठ संपल्याची अफवा पसरल्यानंतर मिठाच्या किमती अचानक वाढल्या. हीच अफवा औरंगाबादेत पसरल्यानंतर रात्री साडेदहा वाजेनंतर लोकांनी मोंढ्यात गर्दी करून व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर थप्पी मारून ठेवलेल्या मिठाच्या गोण्या लुटून नेल्या. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. दरम्यान, राज्यात पुरेसे मीठ असून लोकांनी गोंधळून जाऊ नये, असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री केले.

देशात मिठाचा तुटवडा असल्याने किमतीत प्रचंड वाढ होणार असल्याची अफवा आधी उत्तर प्रदेशातील अनेक शहरातून आली. त्यानंतर ती हळूहळू देशभर पसरली. शुक्रवारी रात्री ९ वाजता ही अफवा औरंगाबादेत धडकली. तशी शहागंज, चेलीपुरा, िकराडपुरा, रोशन गेट, चंपा चौक, पडेगाव, बायजीपुरासह शहरात बऱ्याच ठिकाणी मीठ खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दीचा फायदा घेत दुकानदारांनी जास्त दराने मिठाची विक्री सुरू केली होती. लोकांनी ५ ते २० किलोपर्यंत मीठ खरेदी केली. ही अफवा शहरभर झपाट्याने पसरल्यानंतर नागरिकांनी आपला मोर्चा मोंढ्याकडे वळवला. विविध भागातून लोकांचे लोंढे मोंढ्यात दाखल होऊ लागले. या लोकांनी व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर थप्पी लावून ठेवलेली मीठाची पोती जमेल तशी लुटून नेली. ही लुटालुट सुरू असतानाच काही व्यापाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली तरीही पोलिस तातडीने मोंढ्यात पोहोचले नाहीत. त्यामुळे आलेल्या लोकांनी मीठाची पोती लुटून मोंढा अक्षरश: साफ केला. त्यानंतर जीन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष वसुलकर ४० पोलिस जवानांसह मोंढ्यात आले. त्यांनी आधी लोकांची समजूत घालून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. पण गर्दी आटोक्यात येत नसल्यामुळे पोलिसांना लोकांवर सौम्य लाठीमार करावा लागला.
बातम्या आणखी आहेत...