आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"समांतर' हा बनवाबनवीचा खेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कागदावर ७९२ कोटी रुपयांची किंमत दाखवून प्रत्यक्षात आगामी २० वर्षांत ठेकेदाराच्या घशात २३८१ कोटी रुपये घालणारी समांतर जलवाहिनी योजना म्हणजे बनवाबनवीचा खेळ असून याविरोधात नागरिकांनी उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद सोशल फोरमचे डॉ. विजयदिवाण यांनी केले.

"समांतर'च्या माध्यमातून होत असलेल्या पाण्याच्या खासगीकरणाविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या फोरमने आता या योजनेच्या भूमिपूजनाच्या तोंडावर ही तोफ डागली. डॉ. विजय दिवाण, सुभाष लोमटे आणि इतर मान्यवरांनी एका पत्रकार परिषदेत या योजनेचे पुन्हा एकदा वाभाडे काढले. डॉ.. दिवाणम्हणाले की, जी योजना अजून सुरूच झाली नाही त्या योजनेच्या नावाखाली चक्क २०११ पासूनच पाणीपट्टी वाढवण्यात आली आहे. ही वाढ कशाच्या आधारावर केली हे समजायला हवे.

ठेकेदाराला फायदा व्हावा या हेतूनेच जायकवाडी ते औरंगाबाद या मार्गावर पाणी विकण्याची परवानगी ठेकेदाराला देणे साफ चुकीचे असल्याचे दिवाण म्हणाले. समांतर जलवाहिनीचे श्रेय घेण्याची चढाओढ सध्या लागली आहे, असे सांगत खासदार खैरे यांना टोला लगावला. सुभाष लोमटे म्हणाले की, पाणी ही अत्यावश्यक गोष्ट असल्याने ती मोफतच मिळायला हवी. याविरोधात लोकशक्ती उभी केली जाणार आहे. पत्रकार परिषदेला अजमल खान, सुभेदार सुखदेव बन, उद्धव भवलकर यांची उपस्थिती होती.
याचे उत्तर कोण देणार?
ठेकेदाराला ७९२ कोटींच्या वर एक छदाम देणार नाही असा जनकल्याणवादी आव मनपा आणत असताना प्रत्यक्षात मनपा ठेकेदाराला कार्यवहन अनुदानाच्या नावाखाली आगामी २० वर्षात २३८१ कोटी रुपये देणार आहे. हा पैसा मनपा कोठून आणणार आहे याचे उत्तर मनपा आयुक्त, शहर अभियंता, खासदार खैरे यांनी का दिले नाही, असा सवाल डॉ.. दिवाणयांनी केला.

न्यायालयात प्रकरण असताना भूमिपूजन?
समांतर जलवाहिनी संदर्भात आपण न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही, असे असताना न्यायप्रविष्ट योजनेचे उद्घाटन करणे चुकीचे असून जर खटल्याचा निकाल योजनेच्या विरोधात गेला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल. त्यामुळे या योजनेचे उद््घाटन करू नये, असे राजेंद्र दातेे पाटील यांनी एका निवेदनात म्हटले.