आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर: पाइपच्या ठरावाची मुंबईत बैठक, भाजपच्या निवेदनानंतर २४ तासांत बैठकीचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनीत १५३ कोटी रुपये वाचवण्याच्या कारणाखाली ऐनवेळी घुसडलेल्या एचडीपीइ पाइप वापराच्या ठरावाचे प्रकरण आता चांगलेच भडकले अाहे. कालच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर आज नगरविकास राज्यमंत्र्यांनी याच विषयावर सर्व संबंधितांची येत्या १ जुलै रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. भाजप समांतरवरून एकामागोमाग एक धक्के देत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असून त्याचाच हा पुढचा टप्पा मानला जात आहे.

महापालिकेत आणि राज्यात शिवसेना व भाजप युतीच्या माध्यमातून सत्तेवर आले असले तरी शहरात समांतर जलवाहिनीवरून या दोन पक्षांत आता खुलेआम लढाई सुरू झाली आहे. खासदार खैरे यांच्यासह शिवसेनेसाठी अडचण ठरत असलेल्या समांतरच्या एकूण कारभारावर भाजपने चौफेर हल्ले सुरूच ठेवले आहेत. आधी पाणीपुरवठ्यावरून नंतर गेल्या १० दिवसांपासून डीआय ऐवजी एचडीपीइ पाइप वापरण्यावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे. याच विषयावर शिवसेना व भाजपने आपापले वर्चस्व असणाऱ्या अनुक्रमे सर्वसाधारण सभा व स्थायी समितीत परस्परविरोधी ठराव घेत या विषयाला वेगळे वळण दिले आहे. आता हे भांडण मुंबई दरबारी पोहोचले आहे.

शिवसेनेने क्लृप्ती लढवून मंजूर केलेला एचडीपीइबाबतचा ठराव बेकायदा असून तो विखंडित करण्याची मागणी काल भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली. एवढेच नव्हे तर निवेदनाशिवाय खासगी चर्चेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना या विषयात शिवसेनेचे नाक ठेचण्याची संधी असल्याचे सुचवत समांतरबाबतच्या सगळ्या तक्रारींचा पाढा वाचला. शिवसेना व भाजपमधील संघर्ष एवढा भडकला की, पालकमंत्री रामदास कदम यांनी चक्क समांतरला आडवे येणाऱ्यांना आडवे करू इतपत भाषा वापरल्याने प्रकरण हाताबाहेर चालले आहे. याबाबत आता भाजप अधिक आक्रमक झाला असून शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी ही संधीच आली आहे.

काल निवेदन, आज बैठकीचा निर्णय
समांतरबाबत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या तक्रारींची भाजपनेत्यांनी गांभीर्याने दखल घेतल्याचे आजच्या निर्णयावरून दिसून आले. कालच मुख्यमंत्र्यांनी निवेदनावर चौकशी करा असे लिहून ते पुढे सरकवले, तर आज नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या कार्यालयाने त्याची तत्काळ दखल घेत पुढचे पाऊल उचलले. राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव दीपक कासार यांनी आज मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांना पत्र पाठवून समांतरच्या पाइपबाबत २ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या ठरावाबाबत १ जुलै रोजी राज्यमंत्र्यांच्या दालनात बैठक बोलावण्यात आल्याचे कळवले आहे. या बैठकीआधी भगवान घडामोडे यांनी दिलेल्या निवेदनातील नमूद प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल २९ जूनपर्यंत पाठवावा असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १ जुलैच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

बोलावणे आल्याशिवाय नाही : या घडामोडींमुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली अाहे. महापौर त्र्यंबक तुपे यांना बैठकीला जाणार का असे विचारले असता त्यांनी जर बैठकीला हजर राहण्यासंदर्भात बोलावणे आले तर निश्चित जाऊ व आपले म्हणणे मांडू. पण आपल्याला अजूनपर्यंत तरी काही निरोप अथवा पत्र आलेले नाही, असे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...