आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\"समांतर\' प्रकल्पाचे काउंटडाऊन सुरू ? \"सुकाणू\' बैठकीत शेलक्या शब्दांत हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर प्रकल्पाबाबत नेमलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत सदस्यांनी शेलक्या शब्दांत ओढलेले टीकेचे आसूड, मनपाच्या अधिकाऱ्यांनीही व्यक्त केलेली हताशा आणि त्यातून उफाळलेला संताप यामुळे समांतरचे काम करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या दिशेने हालचालींना वेग आला आहे. करार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करा असाच सूर पदाधिकाऱ्यांनी लावल्याने आता या योजनेचे काउंटडाऊन सुरू झाल्याची चिन्हे आहेत.

बुधवारी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात समांतरच्या सुकाणू समितीची बैठक झाली. त्यात समांतर व मनपा अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरीत कडक शब्दांत झापले. गेल्या महिन्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली किरकोळ कामे दोन दिवसांत करू असे सांगूनही न करणे, पालकमंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट निर्देश देऊनही जायकवाडी ते औरंगाबाद पाइपलाइनचे काम १५ दिवसांत न करणे आणि आदेश देऊनही बिल वसुली सुरूच ठेवणे यावरून आज अफसर खान, उपमहापौर संजय जोशी समांतरच्या अधिकाऱ्यांवर तुटून पडले. संतापाच्या भरात त्यांनी शेलक्या शब्दांचा वापर केला.

मी जाळून घेतो

अफसर खान यांच्या वॉर्डात चार महिन्यांपासून एक पाइपलाइन बदलायची आहे. गेल्या बैठकीत ती दोन दिवसांत बदलू असे समांतरचे अधिकारी म्हणाले होते. पण काम झाले नाही. तुम्ही आम्हाला मूर्ख समजता काय?
लोक जसे आम्हाला शिव्या घालतील तसे ते तुम्हाला पण सोडणार नाहीत असे सांगून काम झाले नाही तर जाळून घेईन असा इशारा दिला. तावातावात त्यांनी पाण्याची बाटली वाकडी करून फेकण्याची तयारीही केली. त्यांना कसेबसे आवरले पण ते बैठकभर उभेच राहिले. काम होईपर्यंत बसणार नाही असे ते म्हणाले.

करारच रद्द करा : या सर्वांनी कंपनीवर टीका करीत प्रशासनाने त्यांना पाठीशी न घालता करार रद्द करण्याची कारवाई तातडीने सुरू करण्याची मागणी केली. एकट्या महापौर कला ओझा मात्र कामे कशी लवकर होतील ते बघा अशा सूचना देत होत्या.

केणेकर- आयुक्त वादावादी : सुकाणू समितीतील सदस्य समांतरच्या अधिकाऱ्यांवर तुटून पडत असताना संजय केणेकर यांनी आपण प्रशासनाला जाब विचारला पाहिजे असे म्हणत मनपाच्या अधिकाऱ्यांवर टीका केली. कंपनीला प्रशासन का पाठीशी घालते याचे गौडबंगाल कळू द्या असे म्हणत त्यांनी प्रशासनाला काय मिळते असा थेट सवाल केला. आयुक्त प्रकाश महाजन यांना उद्देशून त्यांनी तुम्ही पण कंपनीला मिळालेले आहात असे सांगत प्रशासनालाच कंपनीला इथे ठेवायचे आहे, असा आरोप केला. यावर पानझडे यांनी केणेकर यांना ते आयुक्त आहेत, असे बोलू नका असे सांगताच केणेकर भडकले. यावरून पुन्हा जोरदार खडाजंगी झाली व आयुक्त ताडकन उठले व तुम्ही काय करायचे ते करा मी चाललो असे म्हणत निघून गेले. महापौरांनी त्यांना थांबायची विनंती करूनही ते थांबले नाहीत.
पाणीपट्टी भरू नये
^कंपनीने एक रुपयाचे काम केले नसताना ते आजही लोकांकडून वसुली करीत आहेत. मनपाने आता त्यांना एक रुपयाही देऊ नये. जनतेनेही पाणीपट्टी भरू नये, त्याशिवाय हे ठिकाणावर येणार नाहीत.संजय जोशी, उपमहापौर
प्रशासन हस्तक

^कामे होत नाहीत म्हणून आम्ही कंपनीला शिव्या घालण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालणाऱ्या मनपा प्रशासनाला धारेवर धरले पाहिजे. कंपनीचे हस्तक असल्यासारखे प्रशासन वागत आहे.
संजय केणेकर, भाजप गटनेते
उपमहापौरांचाही संताप

आपल्याही वॉर्डात ऑक्टोबरपासून पाइपलाइनची दोन कामे पेंडिंग आहेत. उपमहापौराचेही हे लोक ऐकत नसतील तर काय करावे, असा सवाल करीत त्यांनी तावातावाने समांतरच्या कारभाराची लक्तरे काढली. कंपनीने २५ हजार रुपयांचेही काम केले नसताना त्यांना दरमहा पाच कोटी का देतोय, असे विचारत मार्चमध्ये आचारसंहितेचा फायदा घेऊन कंपनीच्या घशात ६३ कोटींचा हप्ता घालू नका, असे संजय जोशी म्हणाले.

सभापतींचेही काम ठप्प

सभापती विजय वाघचौरे यांनी आपल्या वॉर्डात लाइन बदलण्याचे काम झाल्याशिवाय रस्ता करता येत नसल्याचे सांगत समांतरला फैलावर घेतले. सभागृह नेते किशोर नागरेंनी आपल्या वॉर्डातील दूषित पाण्याची तक्रार चार महिन्यांपासून दूर झाली नसल्याचे सांगितले. समीर राजूरकर, मीर हिदायत अली यांनीही कंपनीच्या कारभारावर टीका केली.

माझेही ऐकत नाहीत : पानझडे

पालकमंत्री कदम यांनी तुम्ही कंपनीचे अधिकारी आहात का? असे विचारून ज्यांना झापले होते ते शहर अभियंता सखाराम पानझडे यांनीही कंपनीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते माझेही ऐकत नाहीत हो, असे हताश उद्गार काढत त्यांनीही आता कारवाई करावी लागेल असे म्हटले.

करार रद्द होणार?

समांतरच्या कारभाराबाबत वाढत असलेली नाराजी व पदाधिकाऱ्यांचा रोख पाहता करार रद्द करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत, असे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आता कंपनीला निर्णायक नोटीस देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. याबाबत येत्या दोन दिवसांत फैसला होणार आहे.

फोटो : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बुधवारी समांतरच्या सुकाणू समितीची बैठक झाली. या वेळी संताप व्यक्त करताना अफसर खान.