छायाचित्र : नळ कनेक्शन अधिकृत करण्यासाठी लाच घेणारा बोबडे.
औरंगाबाद - नळाचे कनेक्शन नियमित करू देण्यासाठी लाच घेणारा समांतरचा समन्वयक सुबोध सुबराव बोबडे (रा. वेदांतनगर) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या भावाने नवीन नळ कनेक्शनसाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये समांतरकडे अर्ज केला होता. त्या वेळी एका अधिकाऱ्याने तुम्ही कनेक्शन जोडून घ्या, नंतर ते नियमित करून घेऊ, असे सांगितले. बोबडे याला ही बाब कळली तेव्हा त्याने तक्रारदारास धमकावणे सुरू केले. परवानगीशिवाय नळ कनेक्शन घेतल्याने तुमच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होईल. हा गुन्हा दाखल करायचा नसल्यास आणि नळ कनेक्शन नियमित करायचे असल्यास दहा हजार रुपये लागतील, असे सांगितले.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या कार्यालयात लाचेचे आठ हजार रुपये घेताना बोबडे यास उपअधीक्षक विवेक सराफ, प्रकाश कुलकर्णी यांनी रंगेहाथ पकडले. त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत श्रीराम नांदुरे, कैलास कामठे, हरिभाऊ कुऱ्हे, अजय आवले, शेख मतीन यांचा सहभाग होता.