आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरचे भूत उतरवून टाकू, भाजपच्या मेळाव्यात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर झाले आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: कधी सहकारी, कधी अधिकारी, आता तर थेट आमदार अतुल सावेंना धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गाठलेले भाजपचे मनपा गटनेते संजय केणेकर यांची कीर्ती मंत्र्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच की काय आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आलेले पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केणेकरांना असा हात जोडून नमस्कार केला.
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत युतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. दुसरीकडे भाजपने प्रचाराला घणाघाती सुरुवात केली. शिवसेनेला अत्यंत अडचणीत आणणा-या समांतर जलवाहिनी योजनेविषयी तर पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजपच्या ताब्यात महापालिका द्या. मग औरंगाबादकरांच्या मानगुटीवर बसलेले समांतरचे भूत उतरवून टाकू, असे आश्वासन त्यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिले. या वेळी खासदार अमर साबळे, आमदार अतुल सावे, नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहराला २०२५ पर्यंत मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी २००६मध्ये समांतर योजना आखण्यात आली. त्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून निधीही मिळाला. मात्र, खासदार चंद्रकांत खैरे आणि त्यांच्या सहका-यांमधील वादामुळे अजूनही योजनेला वेग आलेला नाही. दुसरीकडे लोकांना वारंवार पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. केवळ ८० दिवस पाणी मिळते. पाणीपट्टी मात्र ३६५ दिवसांची वसूल होत आहे. करारात बदल करून दरवर्षी पाणीपट्टी वाढविण्याचा प्रकारही झाल्याने लोकांमध्ये योजनेविषयी संताप व्यक्त होत आहे. भाजपने हाच प्रचाराचा मुद्दा बनवण्याचे संकेत दिले होते. आज झालेल्या मेळाव्यात त्याचे प्रत्यंतर आले.

श्रीहरी पॅव्हेलियन येथे झालेल्या मेळाव्यात लोणीकर म्हणाले की, समांतरचे भूत शहराच्या मानगुटीवर बसवण्यात आले आहे. त्यामुळे पाणी नसूनही पाणीपट्टी वाढत आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळाली तर हे भूत उतरवून टाकू. स्वच्छ, मुबलक पाणी देण्यासाठी राज्य, केंद्र सरकार आणि जागतिक बँकेचीही मदत घेऊ. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही एकाच योजनेतून महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग समजून समांतरचा नवा मास्टर प्लॅन बनवा. मात्र, आधी दिल्लीत केला तसा चमत्कार करून भाजपला महापालिकेची बहुमतात सत्ता मिळवून द्या. मनपात उमेदवारी मिळाली नाही तरी कार्यकर्त्यांना दुस-या सत्ता केंद्रात अनेक संधी आहेत, असेही ते म्हणाले.

समांतर उखडून फेकून द्या
तत्पूर्वी माजी आमदार श्रीकांत जोशी म्हणाले की, शहराचा खेळखंडोबा करणारी समांतर उखडून फेकून द्या. सावे म्हणाले की, समांतरवर मी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. पुढच्या १५ दिवसांत मुख्यमंत्री, नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे. माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनीही समांतरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन केले. माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी समांतरमधील जाचक अटी बदलाव्यात, अशी मागणी केली. मनपातील गटनेते संजय केणेकर यांनी धर्माऐवजी विकासाच्या कामावर मागा, असा उपरोधिक सल्ला शिवसेनेला दिला.

भाजपचेही संभाजीनगर
शहरात ५ कोटी खर्चून आणखी एक नाट्यगृह बांधण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दिल्लीत भाजपची सत्ता असल्याने औरंगाबादचे नाव संभाजीनगरच होणार असल्याचे लोणीकर म्हणाले.

अतुल सावे-संजय केणेकर साथ साथ
बुधवारी उमेदवारांच्या मुलाखत कार्यक्रमात सावे-केणेकरांमध्ये जोरदार वादावादी झाली. याबद्दल दोघांचीही वरिष्ठांनी कानउघाडणी केली. त्यामुळे आजच्या मेळाव्यात दोघे जण व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसून सौम्यपणे बोलत असल्याचे दिसून आले.

कार्यकर्ते गोळा केले
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र, दोघेही येणार नसल्याचे सकाळीच स्पष्ट झाल्याने नियोजनानुसार दुपारी तीन वाजता सुरू होणा-या मेळाव्याला सायंकाळी साडेपाच वाजता सुरुवात झाली. स्थानिक पदाधिका-यांनी धावपळ करत कार्यकर्ते गोळा केले. या वेळी शहराध्यक्ष भगवान घडामोडे, डॉ. भागवत कराड, उपमहापौर संजय जोशी, दिलीप थोरात, प्रवीण घुगे, प्रमोद राठोड यांचीही उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांनी 'दिव्य मराठी'ची परीक्षा द्यावी
प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर म्हणाले की, ‘दिव्य मराठी’ने इच्छुक उमेदवारांसाठी चार एप्रिल रोजी परीक्षा ठेवली आहे. ही परीक्षा म्हणजे कार्यकर्त्यांना महापालिकेचा कारभार जाणून घेण्याची मोठी संधी आहे. म्हणून भाजपच्या सर्व इच्छुकांनी ही परीक्षा द्यावी.