आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारीच तुटून पडले ‘समांतर’वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनीवरून नागरिकांत निर्माण होणारा रोष आगामी मनपा निवडणुकीत धोकादायक ठरू शकतो हे लक्षात येत असल्याने ही योजना आणणाऱ्या शिवसेनेने समांतरवर हल्लाबोल केला. भाजपनेही समांतरच्या आतापर्यंतच्या कामाचे वाभाडे काढत आपणही जनतेच्या बाजूनेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यात विरोधकही हिरिरीने सहभागी झाले आणि शेवटी दोन दिवसांत समांतरबाबत विशेष बैठक बोलावण्याची घोषणा महापौर कला ओझा यांनी केली.
आचारसंहितेमुळे दोन महिन्यांच्या खंडानंतर मनपाची आज खुली सर्वसाधारण सभा झाली. पाच तास झालेल्या सभेत तासभर समांतरवर चर्चा झाली. सप्टेंबरपासून शहराचा पाणीपुरवठा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आल्यापासून पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.
त्र्यंबक तुपे यांनी समांतर योजना येऊनही नागरिकांना सुविधा मिळत नाहीत, असा आरोप केला. एक व्हॉल्व्ह बदलायला १५ दिवस लागतात, नळाला ड्रेनेजचे पाणी येते, त्याची दुरुस्ती होत नसल्याचे म्हटले. उपमहापौर संजय जोशी म्हणाले, मनपाने त्यांना जागा दिली, फुकट टँकर दिले; पण गणपती विसर्जनासाठी मनपाला पाणी विकत घ्यावे लागले. पाण्यासाठी हायड्रोलिक माॅडेल येणार येणार असे नुसतेच ऐकतो. ते कधी येणार, आम्हाला बघू तर द्या, असे सांगत ज्या कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे त्यांनी ते केलेच नसल्याचा आरोप केला. त्यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी १५ तारखेला हे माॅडेल येईल असे कंपनीने आम्हाला सांगितल्याचे म्हटले. त्यावर नगरसेवकांनी पुन्हा हल्ला चढवला. आधी पाणी, नंतर वसुली असे आधी ठरले होते; पण आता कंपनी उलटेच काम करत आहे. फुकट नळ कनेक्शन घेणाऱ्यांना काही होत नाही; पण हे समांतरवाले प्रामाणिकपणे पैसे भरणाऱ्या नागरिकांना छळत आहेत, असा आरोप या वेळी करण्यात आला.
शिवसेना का आक्रमक?
असंतोष : वाढीव पाणीपट्टी, नळांना मीटर, दर दोन महिन्यांनी बिले, सध्याच्या पाणीपुरवठ्यावरून असलेला असंतोष मनपा निवडणुकीत महागात पडू शकतो, हे लक्षात येत आहे.

तनवाणींमुळे बदनामी : ज्या समांतर योजनेचे आतापर्यंत शिवसेना श्रेय घेेते ती किती फसवी आहे, हे शिवसेनेचे माजी आमदार व आता भाजपवासी झालेले किशनचंद तनवाणी सांगत असल्याने बदनामीची शिवसेनेला धास्ती

योजनाही रखडली : समांतर योजनेची किंमत वाढवण्यास खासदार खैरेच जबाबदार असल्याचा आरोप करत तनवाणी यांनी ही योजना रखडवण्यात त्यांचाच हात असल्याचा आरोप वारंवार केला आहे. आता भाजप त्याचा फायदा मनपा निवडणुकीत घेण्याच्या तयारीत आहे.
भाजपचे टीकास्त्र का?
प्रचाराचा मुद्दा : शिवसेनेच्या विरोधात जाणारी समांतर हाच प्रचाराचा मुद्दा.

परतफेड : समांतरचे सगळे श्रेय खैरे आपल्याकडे व शिवसेनेकडे घेत आहेत. संपूर्ण योजनेच्या पाठपुराव्यातही त्यांनी भाजपला सोबत घेतले नव्हते. त्याची परतफेड करण्यासाठी.

आरोपीच्या पिंजऱ्यात : भूमिगत गटार योजना, एलईडी या विषयांवर शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यास किमान १० जागांवर यश.

पक्षाचे मजबुतीकरण : आक्रमकतेचा संदेश देऊन शिवसेनेच्या काही नगरसेवकांना ओढून पक्ष मजबुतीचा प्रयत्न.
ठेकेदार समाधान करेल
आतापर्यंतचा मनपाचा राजकीय इतिहास लक्षात घेता महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत फारसे काही निष्पन्न होण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेच्या टीकाखोर नगरसेवकांचे समांतरच्या ठेकेदाराकडून सर्व अर्थाने समाधान केले जाईल.
भाजप नगरसेवकांच्या समाधानासाठी समांतरच्या चौकशीसाठी एखादी समिती नियुक्त करून त्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्थान िमळेल.