आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराने डेडलाइन संपता संपता मनपाला दिलेल्या पत्रात काय म्हटले आहे, याचा सस्पेन्स बुधवारी आणखीच वाढला. स्थायी समितीच्या बैठकीत मीर हिदायत अली यांनी हा प्रश्न विचारला आणि उपायुक्त सुरेश पेडगावकर, शहर अभियंता सखाराम पानझडे आणि कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी अस्वस्थ होत एकमेकांकडे पाहिले. पेडगावकर आणि कोल्हे यांनी हे पत्र अद्याप आपल्यापर्यंत आले नसल्याचे सांगत हा विषय संपवून टाकला.
समांतर जलवाहिनी त्या मूळ प्रकल्पापेक्षा त्यासंदर्भातील हालचालींनीच अधिक चर्चेत आली आहे. या प्रकल्पाबाबत नेमके चालले काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच असली तरी त्याचे स्पष्टीकरण मिळत नसल्याने त्यात आता सस्पेन्सची भर पडली आहे. कागदपत्रे आणि लेखाबंद सादर करण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी कंत्राटदाराने आयुक्तांकडे ती कागदपत्रे आणि पत्र सादर केले. त्या पत्रात काय आहे याची उत्सुकता सर्वांनाच आहे. विशेष म्हणजे मनपामध्ये मोजक्या लोकांनाच या पत्राची प्रत मिळाली असल्याची चर्चा आहे. पदाधिकार्यांना मात्र या पत्राची प्रत देण्यात आली नाही. स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांनी स्वत: आयुक्तांना भेटत प्रत मागितली तेव्हा उद्या पाठवून देतो, असे सांगितले; पण आजतागायत ते पत्र न मिळाल्याने कुचे अस्वस्थ झाले आहेत.
बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मीर हिदायत अली यांनी हा प्रश्न उपस्थित केला. उपायुक्त सुरेश पेडगावकर यांना असे पत्र मिळाले आहे का, असे विचारले असता कुचे म्हणाले, मलाच मिळालेले नाही. पेडगावकर यांनीही आपल्याकडे पत्र आले नसल्याचे सांगितले. त्यानंतर हेमंत कोल्हे यांना विचारणा केली असता त्यांनीही असे पत्र आलेले नाही हे स्पष्ट केले. हा प्रश्न विचारला गेला तेव्हा पेडगावकर, पानझडे आणि कोल्हे यांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक चेहर्याने पाहिले तेव्हा या पत्राचा सस्पेन्स अधिकच गडद झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.