आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर ओझांमुळेच समांतर लागली मार्गी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेच्या भूमिपूजनासाठी येणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी समांतरचे श्रेय स्वत:कडे आणि महापौर कला ओझा यांच्याकडे घेतल्याने औरंगाबाद मध्य मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महापौरांना प्रोजेक्ट केले जात असल्याची चर्चा आहे.

खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीत ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तयारीबाबत सूचना केल्या. त्या वेळी समांतर जलवाहिनीबाबत बोलताना खैरे म्हणाले की, समांतर जलवाहिनी प्रकल्पात मनपा आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे यांचे काडीचेही योगदान नाही. ही योजना माझ्यामुळे झाली आहे. आयुक्त आणि काही अधिकाऱ्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, असे सांगितले. ते म्हणाले की, महापौर कला ओझा यांनी दम दिल्याने समांतरसंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यांनी बैठक घेतली नसती तर योजना मार्गी लागलीच नसती. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे. २००६ पासून या योजनेसाठी घेण्यात आलेल्या मेहनतीला फाटा देण्याचेच काम आयुक्तांनी केल्याचे ते म्हणाले.
समांतरचे श्रेय आपल्याकडे घेतानाच महापौरांचे कौतुक खैरे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया वर झाल्या. महापौर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या तोंडावर महापौरांना समांतरचे श्रेय देत खैरे त्यांना प्रोजेक्ट करीत असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. मध्य मतदारसंघात विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी हे ताकदवान नेते इच्छुक असल्याने त्यांच्या वादात नवीन उमेदवार द्यायची वेळ आली तर महापौरांचे नाव उपयोगी पडू शकते.
पदाधिकारी नाराज
दुसरीकडे समांतरसंदर्भात मनपाने वेळोवेळी जे निर्णय घेतले, ज्यांच्या काळात योजना पुढे सरकली त्या पदािधकाऱ्यांचाही त्यात वाटा असताना फक्त महापौरांचे कौतुक केल्याने आजी-माजी पदािधकारीही नाराज झाले आहेत.