आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपूर्वीच्या उपक्रमाचा मनसेला विसर! समर्थनगर येथील बारव पुन्हा झाले खंडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळी भागातील पारंपरिक जलस्राेतांचे पुन्हा पुनरुज्जीवन करा. ज्या प्रमाणे औरंगाबादेत विहिरी आणि तळ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम राबवण्यात आला तो राज्यभर राबवा, असे आवाहन करत मार्च २०१३ रोजी राज ठाकरे यांनी जालना येथील जाहीर सभेत शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर राज्यभरात नद्यांचे पात्र, तळी आणि विहिरीतील गाळ काढण्यास सुरुवात झाली. मात्र मनसैनिकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा यंदा त्यांनाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.
मार्च २०१३ मध्ये मनसैनिकांनी समर्थनगर येथील ५०० वर्षे जुन्या पालवे वाड्यातील बारव स्वच्छ करून पाणी वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले होते. या वेळी कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांना या विहिरीतील गाळ भेटही दिला होता. राज ठाकरे यांनी स्वत: स्वच्छ केलेल्या बारवची पाहणी करून उपक्रमाचे कौतूक केले होते. तेवढ्या पुरताच हा उपक्रम मर्यादीत राहिला. त्यानंतर मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. परिणामी या बारवेचे पुन्हा खंडर झाले.
साथमिळाली नाही : मीमनसेत होतो तेव्हा लाख ३० हजार रुपये खर्च करून बारव साफ केली होती. यासाठी मला सतनामसिंग गुलाटी आणि इतर कार्यकर्त्यांनी मदत केली, असे अमित भांगे यांनी सांगितले. १९७२ च्या दुष्काळात या बारवाने शहराची तहान भागवली होती. आजही यातून ३० ते ३५ पेक्षा अधिक टँकर पाणी दररोज मिळू शकते. पाण्याचा उपसा अधिक झाल्यास पाणी पिण्यायोग्य होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र त्या वेळी कोणीही मनावर घेतले नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही विनंती केली. मात्र त्यांनीही दुर्लक्ष केले. नंतर मी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला, असे भांगे म्हणाले.

सातारा निवडणुकीत गाजला पाण्याचा मुद्दा
नुकत्याच झालेल्या सातारा-देवळाई पोटनिवडणुकीत पाण्याचा मुद्दा गाजला. तीन वर्षांपूर्वी मनसेने या भागातील सिंधोन भिंदोन येथील तलावातून गाळ काढण्याचे काम केले होते. किशनचंद तनवाणीदेखील गेली दोन वर्षांपासून शहरात पाणी वाटप करतात. या उपक्रमाचा त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला आहे.

या विहिरींची होऊ शकते स्वच्छता
भावसिंगपुऱ्याजवळ असलेली गंगा बावडी, हिमायतबागेतील शक्कर बावडी, हरसिद्धी देवीच्या मंदिरातील तीन जुन्या बावड्या, विद्यापीठ परिसरातील १२ विहिरी, सातारा गावच्या जवळ असलेली बावडी, नहर-ए-अंबरी यासह शहागंज सिडको परिसरात २८ विहिरी आहेत. यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला अाहे. यातील गाळ उपसा केल्यास चांगले पाणी मिळू शकते.
समर्थनगर येथील ५०० वर्षे जुन्या बारवची अशी दुरवस्था झाली आहे.