आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Samarthanagara Campus,latest News In Divya Marathi

छत कोसळून महिलेचा अंत, गोरक्षनाथ मंदिराच्या कळसाचे काम सुरू असतानाची घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बांधकाम सुरू असताना गोरक्षनाथ मंदिराचे छत कोसळल्याने मलब्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. रुक्मिणीबाई रामकिशन जाधव (75) असे मृत वृद्धेचे नाव असून मिस्त्री सुभाष हरिभाऊ घरसोडे (65, रा. जाधववाडी) किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.

समर्थनगर परिसरात मोठा नाला आहे. त्यावर अनेक ठिकाणी बांधकामे करून नागरिक राहतात. या भागात वसाहत प्रचंड वाढली असून देवी-देवतांची मंदिरेही आहेत. बारूदगर नाला आणि समर्थनगर नाला जेथे एकत्र येतात त्या भागात नाथ पंथाचे गोरक्षनाथ मंदिर आहे. हे मंदिर जुने असून तीन महिन्यांपूर्वी त्यावर स्लॅब टाकण्यात आला होता. सध्या या मंदिराच्या कळसाचे काम सुरू होते. घरसोडे ते काम करत होते, तर रुक्मिणीबाई मंदिराच्या स्लॅबखाली बसल्या होत्या. त्या अनेक वर्षांपासून मंदिराची देखभाल करतात. अचानक स्लॅब कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तेथे एकच गर्दी केली. मलब्यातून रुक्मिणीबाई व सुभाष यांना काढून नागरिकांनी घाटी रुग्णालय गाठले; परंतु डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रुक्मिणीबाईंचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सुभाष यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशामक दलाचे अधिकारी-कर्मचारी जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम करत होते.
मदतकार्यात अडथळे
मंदिराचे छत कोसळण्याच्या घटनेची माहिती रविवारी सायंकाळी 5.44 वाजता पोलिस कंट्रोल रूमच्या वतीने अग्निशामक दलाला कळवण्यात आली. यामुळे अधिकारी घटनास्थळी गेले. मात्र, बघ्यांची गर्दी बाजूला सारण्यासाठी सुरुवातीला एकही पोलिस कर्मचारी तेथे नव्हता. त्यामुळे मदतकार्यात बरेच अडथळे येत होते. काही वेळानंतर क्रांती चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागनाथ कोळेकर घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाचे उपअग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, एच. एम. शकील, संपत भगत व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने मलबा काढला.