आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्थापित मराठा समाजाने विस्थापित मराठ्यांचे शाेषण केले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठा समाजात प्रस्थापित अन् विस्थापित असे दोन वर्ग आहेत. प्रस्थापितांनी राज्य केले, पण विस्थापितांचे आर्थिक प्रश्न सोडवले नाही. विस्थापितांचा राजकीय लाभासाठी वापर केला. प्रस्थापित मराठे मनुवाद्यांचे बिनपगारी नोकर बनल्यामुळे आंबेडकरी चळवळीनेच आता विस्थापित मराठ्यांची वकिली करावी, असे परखड मत क्रांतीशाहीर तथा ज्येष्ठ प्रबोधनकार संभाजी भगत यांनी व्यक्त केले. बुधवारी (७ सप्टेंबर) ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने घेतलेल्या विशेष मुलाखतीतून त्यांनी विस्थापित मराठ्यांसाठी संवाद परिषदांचे आयोजन करण्याचे आवाहनही केले.
‘कोपर्डी’ घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा समाजाने क्रांती मोर्चांचे आयोजन केले आहे. अॅट्राॅसिटी अॅक्ट निष्प्रभ करण्याची मागणी त्यांनी यानिमित्ताने केली. यासंदर्भात बोलताना भगत म्हणाले, ‘मराठा समाजातील २० टक्के प्रस्थापितांच्या हाती गाव, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील सत्ता आली आणि त्यांनी स्वत:चा विकास करून घेतला. सत्ताकारणाचे गाजर दाखवून विस्थापित मराठ्यांचे मते लाटली, पण त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवले नाही.
शेतीव्यवसायावर विस्थापित मराठ्यांचे जीवन अवलंबून आहे. हे माहिती असूनही राज्यकर्त्या मराठा समाजाने गेल्या ४० वर्षात शेतीतील संकट दूर केले नाही. त्यामुळे ८० टक्के मराठा समाज विस्थापित, निराशाग्रस्त बनला आहे. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. आता आपल्याच समाजापुढे स्वत:चे पितळ उघडे पडू नये म्हणून प्रस्थापित त्यांना आर्थिक प्रश्नांची जाणीव होऊ देत नाही. सतत त्यांना हिंदुत्वाचे डोस पाजून बळीचा बकरा करत आहे. कधी मुस्लीमांच्या तर कधी आंबेडकर अनुयायांच्या विरोधात विस्थापित मराठ्यांना उभे करून संघर्ष करण्यास भाग पाडत आहे. त्यातून अॅट्रासिटी अॅक्ट विरोधाचे आंदोलने उभे झाले असून त्यामागे सत्ता गमावलेल्या मराठा समाजाचे सर्व दिग्गज माजी मंत्री आहेत. आंबेडकर अनुयायी, डावे, लोकशाहीवादी, पुरोगाम्यांनी यासंदर्भात तिखट प्रतिक्रिया देऊ नये. त्यांनी मराठ्यांना कोरड्या शिव्या देणे आधी थांबवावे. या उलट विस्थापित मराठ्यांना त्यांच्या आर्थिक प्रश्नांची जाणीव करून द्यावी, त्यांच्यासोबत संवाद परिषदा घ्याव्यात, असा सल्लाही भगत यांनी दिला आहे. पुढील महिन्यांपासून आपण स्वत: संवाद परिषदांसाठी मैदानात उतरणार असल्याचे भगत यांनी मुलाखतीतून जाहीर केले. विस्थापित मराठा समाजाला त्यांचे झालेले शोषण सांगावे लागणार आहे. शेतीत आलेले संकट समजून सांगण्यासाठी या संवाद परिषदा महत्वाच्या भूमिका बजावणार आहेत. शेतीत मागील ४० वर्षांपासून मंदीची लाट आहे. त्या लाटेतून बाहेर काढण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. प्रस्थापित मराठे तुमचे प्रतिनिधी नसून ते मनुवाद्यांचे गुलाम अन् बिनपगारी नोकर आहेत, हे त्यांना विस्थापितांना पटवून सांगणे गरजेचे आहे.

सुलटा शिवाजी सांगावा लागणार आहे : मनुवाद्यांनीदेशाला उलटा शिवाजी महाराज सांगितला आहे. आंबेडकर अनुयायांनीच आता शिवाजी महाराज सुलटा करून सांगण्याची वेळ आली आहे. त्यासाठी देखिल संवाद परिषदा महत्वाचे माध्यम ठरू शकते. शिवाजी महाराजांनी केलेले कार्य, त्यांच्यातील धर्मनिरपेक्षता देशाला समजून सांगावी लागणार आहे. त्यासाठी शिव प्रचाराकांची मोठी फळी उभारणे गरजेचे आहे. आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर शिवाजी वाचला तरच सुलटा शिवाजी कळू शकतो ‘द शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला” हे नाटक आपण गोविंद पानसरे यांच्या सुचनेनुसारच लिहिले, असे ते म्हणाले.

आधी कर्मठ हिंदू होतो : किशोरावस्थेपर्यंतमी कट्टर हिंदुत्ववादी होतो. संघाच्या शाखेतही नियमित जात होतो. महाविद्यालयीन जीवनात वडाळा येथील सिद्धार्थ वसतीगृहात माझ्यातील हिंदुत्व गळून पडले. त्यानंतर सुमारे पाच वर्ष फक्त बाबासाहेब आणि पाच वर्ष शिवाजी महाराजांवरील पुस्तके वाचले. गदर आणि मेधा पाटकर यांच्या प्रभावामुळे आज आपण उभे आहोत. त्यानंतर सुमारे ३० वर्षांपासून आपण खेड्यापाड्यात शिवाजी आणि बाबासाहेब सांगण्याचे काम करत असल्याचे भगत यांनी सांगितले.

भगत यांच्या कोर्ट सिनेमाला ३३ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याशिवाय ऑस्करसाठी नामांकन झाले. नागरिक, सरपंच भगीरथला त्यांनी संगीत दिले आहे. मिफ्ता अवाॅर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...