Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Samrudhihi Highway Counting; Attempt To Suicide By Poisoning One In Auranagabad

औरंगाबाद- समृद्धी महामार्गाची मोजणी; एकाचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 07:36 AM IST

  • औरंगाबाद- समृद्धी महामार्गाची मोजणी; एकाचा विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद- समृद्धी महामार्गाची मोजणी सुरू असताना चिकलठाण्याजवळील महालपिंप्री येथील शेतकरी अब्दुल शेख यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महसूल पथकामध्ये खळबळ उडाली. दोन वेळा या शेतकऱ्याला समजावून सांगितल्यानंतरही पुन्हा विष पिण्याचा प्रयत्न केल्यामुळे पथकाने भागातली मोजणी थांबवली. गुरुवारी दुपारी महालपिंप्री येथे समृद्धी महामार्गासाठी मोजणीला सुरुवात करण्यात आली. शेख यांच्या शेतापासून मोजणीला सुरुवात करण्यात आली. मात्र, शेख यांनी मोजणीस विरोध केला. मात्र, तरीही पथकाने मोजणी सुरू ठेवली. शेख यांच्याकडे दोन एकर शेती आहे. ही शेती खूप कष्टाने कमावली असल्यामुळे मला ती द्यायची नाही, असे शेख यांनी पथकाला सांगितले. तहसीलदार सतीश सोनी यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या जमिनीचे बळजबरीने भूसंपादन करणार नाहीत. ही फक्त मार्किंग असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शेख यांनी विरोध दर्शवत दोन वेळा विष पिण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा प्रयत्न करताच मोजणी थांबवण्यात आली.
पळशीमध्येही झाला विरोध :दोन दिवसांपूर्वी पळशी गावातही शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शवला होता. मात्र, प्रशासन तसेच पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर तणाव निवळला होता. त्यानंतर प्रशासनाने पळशीतील मोजणी पूर्ण केली होती.
तालुक्यात१९ गावांची मोजणी पूर्ण :औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन समृद्धी महामार्गात जाणार आहे. आतापर्यंत १९ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. दोन दिवसांपासून महसूल प्रशासनाने मोजणीवेळी पोलिस बंदोबस्त घेतला आहे. यापूर्वीची मोजणी पोलिस बंदोबस्ताशिवाय करण्यात आली.
बळजबरी नाही
समृद्धी महामार्गासाठी ही केवळ मोजणी आहे. शेतकऱ्यांच्या मर्जीनेच मोजणी केली जात आहे. त्यासाठी कुणावरही बळजबरी केली जात नाही. यापूर्वी पोलिस बंदोबस्त घेता शेतकऱ्यांच्या मर्जीनुसार मोजणी करण्यात आली आहे, असे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.

Next Article

Recommended