आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूमाफियांची दहशत; वैजापूरच्या उपविभागीय अधिकारी भोगेंना चिरडण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - पुरणगावात गोदापात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेले वैजापूरचे उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे यांच्या अंगावर भरधाव ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न वाळूमाफियाने केल्याची घटना मंगळवारी घडली.

प्रसंगावधान राखत भोगे रस्त्याच्या बाजूला गेल्याने अनर्थ टळला; परंतु रस्त्याच्या कडेला पडल्यामुळे त्यांना मुका मार लागला, तर त्यांच्यासोबत असलेले तलाठी जितेंद्र चापानेरकर यांना दुखापत झाली. भोगे यांनी पाठलाग करून ट्रॅक्टरचालक अमोल अप्पासाहेब ठोंबरे (27) यास पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध वीरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुरणगावच्या पात्राचा सरकारी लिलाव झालेला नाही. तेथे दिवस-रात्र बेसुमार वाळू उपसा आणि वाहतूक सुरू आहे. अनेकदा तक्रारी करूनही अधिकारी वाळूमाफियांवर कारवाई करत नव्हते. त्यामुळे निनावी फोन करून एकाने भोगे यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे कोणालाही कल्पना न देता भोगे वाळूपट्टय़ाची पाहणी करण्यासाठी गेले. तलाठी चापानेरकर, कोतवाल मनोज जगताप यांना सोबत घेऊन खासगी इंडिका कारने मंगळवारी त्यांनी पुरणगावचा वाळू घाट गाठला.

समोरून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर येताना दिसताच भोगे कारमधून उतरले. चालकाला ट्रॅक्टर थांबवण्याचा इशारा त्यांनी केला. परंतु चालक अमोल ठोंबरे याने वेग वाढवत रस्त्यावर उभ्या भोगे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टर अंगावर येत असल्याचे लक्षात येताच भोगे रस्त्याच्या बाजूला सरकत होते. तेवढय़ात ते खाली पडले. यात त्यांना मुका मार लागला. त्यातच चालकाने ट्रॅक्टर गावाच्या दिशेने दामटला. एका वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गटारात फसला. त्यानंतर भोगे व तलाठी चापानेरकर यांनी पाठलाग करून ट्रॅक्टरचालकाला पकडले आणि वीरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

ट्रॅक्टरचालकावर गुन्हा
पुरणगावचे तलाठी बी. एस. साळवे यांच्या फिर्यादीवरून वाळूतस्कर अमोल अप्पासाहेब ठोंबरे याच्यासह आणखी दोघांवर वीरगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

महसूल विभागात खळबळ
पारदर्शक कामासाठी नेहमी पुढाकार घेणार्‍या भोगे यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी सायंकाळी वैजापूरला भेट देऊन झाल्या प्रकाराची माहिती घेतली.

आज काळय़ा फिती लावून काम
घटनेच्या निषेधार्थ वैजापूर, गंगापूर, खुलताबाद येथील महासेवा केंद्र चालकांनी केंद्रे बंद ठेवली. बुधवारी येथील महसूल कर्मचारी संघटना काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला.
दोन वर्षांपूर्वी नायब तहसीलदार वंदना निकुंभ गोदापात्रात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या वाहनावर वाळूचा ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला होता.