आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sand Mafia At Aurangabad District, Latest News In Marathi

धास्ती सरली: पथके तरीही रात्री वाळूचा उपसा, कारवाई कोण करणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताने प्रशासनाने अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष सात पथकांची टीम तयार केली. पथकांनी महिनाभरात केवळ चार ते पाच अवैध उपसा करणाऱ्या वाहनांवरच कारवाई केली, तर परिसरातून दररोज सुमारे लाखो ब्रास वाळूचा अवैध उपसा होत आहे. हा अवैध उपसा आजमितीस तरी प्रशासनाला रोखणे शक्य असल्याचे दिसत नाही. या अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई कोण करणार, असा सवाल निर्माण होत आहे. दिवसा नजरेत येऊ नये म्हणून वाळू वाहतूकदारांकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर लाखो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे.

पैठणच्या गोदापात्रातील आपेगाव -वडवळी आदी ठिकाणांहून सध्या मोठ्या प्रमाणात शेकडो ट्रक, हायवा तसेच ट्रॅक्टर आदींच्या साह्याने नदीपात्रातून वाळू काढली जाते. रात्रीतून इतर वाहनांनी वाळूची वाहतूक होते. ही वाहतूक थांबण्यासाठी तहसीलदार किशोर देशमुख यांनी वाळू वाहने येण्या-जाण्याच्या मार्गावर मोठमोठे खड्डे तयार केले. मात्र, तरीही वाळू तस्कराने नवीन मार्ग काढत वाळू उपसा सुरू ठेवला आहे. अवैध वाळू उपसा होत असेल तर तहसीलच्या वाळूविरोधी पथकाने या वाहनांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु हे पथक काही गोष्टींकडे कानाडोळा करत असल्याची सामान्यांची ओरड आहे. दररोज शेकडो वाहनांतून वाळू उपसा होत आहे.

> या ठिकाणाहून होतो उपसा : गोदावरीच्या नायगाव, मायगाव, पंथेवाडी आयटीआय, हिरडपुरी, आपेगाव, उंचेगाव या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होतो.

प्रशासनाचे दुर्लक्ष
‘दिव्य मराठी’च्या वृत्तानंतर दोन महिन्यांपूर्वी वाळूविरोधी पथकाची स्थापना केली गेली. मात्र, आता याच पथकावर प्रश्न निर्माण झाला आहे.

चार पोलिस ठाण्याच्या हद्दी
पैठणसहपाचोड, बिडकीन, एमआयडीसी पैठण पोलिस ठाणे या चार ठाण्यांच्या हद्दीतून रात्री ११ ते पहाटे वाजेपर्यंत वाळूची वाहतूक होते. विशेष म्हणजे ज्या वाहनांतून ही वाळूची वाहतूक होते त्यापैकी बहुतेक वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने एखादा अपघात झाल्यास ते वाहन शोधणे कठीण आहे. या विनानंबरच्या वाहनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असले तरी आरटीओचे अधिकारीही कानाडोळा करत असल्याचे यावरून दिसून येते.

वाळूचे अवैध साठे
सध्या वाळू बंद असल्याचा दावा पैठणचे तहसील प्रशासन करत आहे. तरीदेखील जायकवाडी, पिंपळवाडी, ढोरकीन, पाचोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे साठे कसे याचे उत्तर मात्र प्रशासन देताना दिसत नाही. एखाद्या वेळी ज्या वाळू तस्कराने हप्ता वेळेवर दिला नाही त्या वाहनावर कारवाईसाठी अधिकारी त्या वाहनाच्या मागे लागतात. परिणामी वाहने भरधाव चालवून एखाद्या वसाहतीत वाळू टाकून पळ काढतानाचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे.

मोक्काचा विचार
>अवैध वाळू तस्करीवर मोक्का लावण्याच्या संदर्भात अभ्यास सुरू आहे. सध्या बिडकीन, पाचोड परिसरात कारवाई करण्यात आली आहे अवैध उपसा आढळल्यास कारवाई करू.
-बच्चनसिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी , पैठण

>अवैध वाळू उपसा थांबण्यासाठी विशेष पथके स्थापन केली आहेत. परिसरात अवैध वाळू उपसा होत असेल त्यावर कारवाई केली जाईल.
-किशोर देशमुख, तहसीलदार