आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर: अवैध वाळूसाठ्याची माहिती देणाऱ्यास माफियांची मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील गोदावरी नदी पात्रालगत तस्करांनी अवैधरीत्या वाळूसाठा केल्याची माहिती  महसूल प्रशासनाला दिल्याच्या संशयावरून लाखगंगा येथील ग्रामस्थाला पाच जणांनी बेदम मारहाण केली. बुधवारी रात्री नागपूर- मुंबई हायवे रस्त्यावरील भग्गाव शिवारात बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला.  याप्रकरणी  बाबासाहेब तुरकणे यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात मारहाण करणे, दंगल माजवणे, जिवे मारण्याची धमकी देणे या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
लाखगंगा येथील पोलिस पाटील अादिनाथ तुरकणे यांनी त्यांच्या ताब्यातील साठ ते सत्तर ब्रास वाळूचा साठा महसूल विभागाकडून पूर्वपरवानगी न घेता परस्पर विक्री केल्याची तक्रार गावातील ग्रामस्थ बाबासाहेब तुरकणे यांनी महसूल विभागाकडे केली होती. याप्रकरणाचा त्यांनी उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता.
 
महसूल मंडळाधिकारी व तलाठी कल्याण राजपूत यांच्या पथकाने  लाखगंगा येथील शासकीय जमिनीत तस्करांनी मोठ्या प्रमाणात केलेला अवैध वाळूचा साठा जप्त केला होता. त्यामुळे खवळलेल्या प्रवीण माधव तुरकणे, प्रकाश निवृत्ती पडवळ, रमेश भाऊसाहेब सोमासे, योगेश नारायण मोरे या पाच जणांनी भग्गाव शिवारात रात्रीच्या वेळी दुचाकीने घरी परतत असलेल्या बाबासाहेब तुरकणे यांना रस्त्यावर अडवून बेदम मारहाण केली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात जिवे मारण्याची धमकी व दंगलीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी फरार झाले आहेत.

तहसीलदारांना कारवाईचे आदेश
वैजापूर,गंगापूर तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून वाळू तस्कर  खुलेआमपणाने  वाळूचे उत्खनन आणि वाहतूक करीत असल्याचे वृत ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध करून हा प्रकार उघडकीस आणला होता. या वृत्ताची विशेष दखल  उपविभागीय अधिकारी डॉ.संदिपान सानप यांनी घेत वैजापूर, गंगापूर तहसीलदारांना शहरातील गल्लीबोळात जागोजागी साठवणूक केलेल्या वाळू साठ्याचे त्वरेने पंचनामे करून धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  
 
गोदावरी नदी पात्रालगतच्या लाखगंगा येथे महसूल विभागाच्या भरारी पथकाने सहा महिन्यांपूर्वी धडक कारवाई करून शासकीय गायरान जमिनीत अज्ञात तस्करांनी लाखो रुपये किमतीचा वाळू साठा पथकाने पंचनामा करून जप्त केला होता. हा वाळू साठा दक्षता पथकाने लाखगंगाचे पोलिस पाटील आदिनाथ तुरकणे यांच्या ताब्यात दिला होता. मात्र पोलिस पाटलाने वाळू साठ्याची परस्पर विल्हेवाट लावून शासनाचे नुकसान केल्याची तक्रार ग्रामस्थ बाबासाहेब तुरकणे यांनी तालुका प्रशासनाकडे केली होती. तालुका महसूल प्रशासनाने मंडळाधिकारी व तलाठी यांनी लाखगंगा येथे स्वतंत्र पंचनामा करून पथकाने जप्त करून पोलिस पाटील तुरकणे यांच्या ताब्यात दिलेला वाळू साठा जायमोक्यावर नसल्याचा खळबळजनक अहवाल तहसील कार्यालयाकडे २५ मे रोजी सादर केला होता.

पोलिस पाटलाला नोटीस    
पथकाने धडक कारवाईत जप्त केलेला वाळू साठा गायब झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी डॉ.सानप यांनी लाखगंगाचे पोलिस पाटील आदिनाथ तुरकणे यांना तडकाफडकी कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले.  
 
बातम्या आणखी आहेत...