आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचोडच्या सहायक पोलिस निरीक्षकाची 9 दिवसांतच बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - सलग दोन दिवस धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड पोलिस ठाण्याअंतर्गत वाळूच्या वाहनाने अपघात घडल्यानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलिस अधिकार्‍याचा नऊ दिवसांतच पोलिस मुख्यालयी बोलावून शनिवारी नव्या अधिकार्‍याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला. नव्या अधिकार्‍याने पदभार स्वीकारताच बारा वाळूच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. दोन दिवसांपासून पाचोड मार्गे होणारी वाळू वाहतूक पूर्णत: बंद झाली असून पोलिस उपअधीक्षक स्वत: येथे ठाण मांडून आहेत.

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाळू तस्करांनी हैदोस घातला असून दिवसेंदिवस प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे वाळूच्या वाहनाने अपघातात भर घातली आहे. दिवसाकाठी पाचशेवर वाळूच्या ट्रक पाचोडमधून धावतात. शुक्रवारी पाचोडला वाळूच्या ट्रकने दोघांना चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण मृत्यूशी झुंज देत आहे. गुरुवार, 19 जून रोजी पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. चिखलीकर यांची कारमाडला बदली झाली व नव्याने वडोदबाजारच्या सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांची येथे नेमणूक झाली. नव्याचे नऊ दिवस म्हणतात त्याप्रमाणे सर्व काही घडले. पहिल्या दिवशी 35 वाहनांवर कारवाई करून त्यांनी दहा लाखांचा दंड वसूल केला. अवैध दारू विक्री व घरगुती गॅस भरणार्‍यांवर कारवाई केली. परंतु सलग घडलेल्या वाळूच्या वाहनांच्या अपघाताची जिल्हा पोलिस अधीक्षक ईशु सिंधू यांनी गांभीर्याने दखल घेतली व वाळू वाहतुकीला आवर घालण्यास अपयश आल्याचा ठपका ठेवत सुरवसे यांना तातडीने शुक्रवारी पोलिस मुख्यालयात बोलावून व नव्याने पाचोडला सहायक पोलिस निरीक्षक म्हणून भगवान धबडगे यांची प्रभारी नेमणूक करण्यात आली. धबडगे यांनी शनिवारी सकाळी पदभार स्वीकारून वाळू वाहतुकीला लगाम लावण्याचा प्रयत्न केला.