आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू माफियांचे युद्ध पुन्हा पेटले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरल्याच्या कारणावरून गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास दोन गटांत देवळाई चौकात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली. या घटनेत तीन जण जखमी झाले. यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यास घाटीत दाखल करण्यात आले आहे.
देवळाई परिसरातील शेख सलीम अब्दुल कादर यांना अंबड तालुक्यातील शेवता येथील वाळूचा कंत्राट मिळालेला आहे. त्यांचे भाऊ शेख शमीम आणि शेख नाजीम हे त्यांना वाळूच्या व्यवहारात सहकार्य करतात. गेल्या अनेक दिवसांपासून शेख सलीम आणि सातारा परिसरातील एकता चालक-मालक संघटनेत वाद सुरू आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाळूचा उपसा करून ट्रक ओव्हरलोड करत असल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला. गुरुवारी सकाळी शेख शमीम आणि शेख नाजीम हे नेहमीप्रमाणे ट्रकमध्ये (एमएच 20 एटी 8699) वाळू घेऊन देवळाई चौकात येत होते. या वेळी एकता चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी शेख ख्वाजा शेख इस्माईल आणि शेख युसूफ शेख कोदन यांनी शेख शमीम यांचा वाळूचा ट्रक अडवला. क्षमतेपेक्षा जास्त वाळू घेऊन का जाता असा जाब विचारला.
दरम्यान, त्यांच्यात वाद सुरू झाला. शेख शमीम यांनी शेख ख्वाजा आणि शेख युसूफ यांच्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच ट्रकच्या काचा फोडल्या. हा प्रकार पाहून देवळाई परिसरातील काही नागरिक जमा झाले. त्यांनी ख्वाजा आणि युसूफवर होत असलेल्या दगडफेकीला विरोध केला. त्यानंतर शेख चांद आणि अमीर यांच्यासह आलेल्या जवळपास 50 जणांनी शेख शमीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. यात शेख शमीम गंभीर जखमी झाले, तर ख्वाजा अणि युसूफ किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.