आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिलावाअाधीच वाळूची तस्करी, गोदावरी पोखरली, रात्रीच्या वेळी वाहतूक, रस्त्यांची झाली चाळणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- माजलगाव तालुक्यातील एकाही वाळूपट्ट्याचा यंदा लिलाव झाला नसताना महसूल प्रशासनाच्या वाळूघाटात लिलावाआधीच तस्करांकडून वाळू चोरली जात असल्याने गोदावरी पोखरत चालली आहे. मोगरा वाळूपट्ट्यात दीड महिन्यापासून वाळू माफियांच्या टोळ्या तस्करी करत आहेत. दररोज दहा टायरचे शंभर ते दीडशे ट्रक मध्यरात्री फिरत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली असून गावांना जाणाऱ्या बस महामंडळाने बंद केल्या आहेत.

माजलगाव तालुक्याच्या हद्दीमधील हिवरा, शेलगावथडी, कवडगाव थडी, डुब्बाथडी, जायकोवाडी, सादोळा, मंजरथ, आबेगाव, बोरगाव, सरवरपिंपळगाव, आडोळा, सोन्नाथडी, शुक्लतीर्थ लिमगाव, मोगरा या गोदावरीच्या वाळूपट्ट्यात दीड महिन्यापासून वाळू माफियांच्या टोळ्या गोदापात्रातील वाळूची तस्करी करत आहेत. अशा भागातून हजारो ब्रास वाळूचा अनधिकृतपणे उपसा सुरू आहे. अशा भागातील महसूल प्रशासनाच्या घाटातील लिलावाआधीच वाळू चोरली जात आहे. दररोज या भागातून दहा टायरचे दीडशे ट्रक रात्री १० ते सकाळी या वेळेत वाहतूक करत असल्याने ग्रामीण भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावच्या बस माजलगाव आगाराने बंद केल्यामुळे प्रवाशांचे हाल, तर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑगस्ट महिना सरला तरी पाऊस झाला नसून गोदावरी नदीचे पात्र धोक्यात सापडले आहे. पर्यावरण विभागाने परवानगी दिल्यामुळे मागील वर्षी माजलगाव तालुक्यातील वाळूपट्ट्याच्या लिलाव झालाच नाही. सध्या कसलाही ठेका जाहीर झाला नसताना वाळू उपसा सुरू आहे. बेसुमार वाळू उपशामुळे गावांची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. अशा वाळू तस्करीवर जिल्हाधिकारी राम यांनी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

तक्रारी करूनही कारवाई होत नाही
अनेकवाळू तस्कर गाव पुढाऱ्यांशी संगनमत करून त्या-त्या गावात मोठे वाळूसाठे करून ठेवत आहेत. याप्रकरणी नागरिकांनी महसूल पोलिसांकडे तक्रारी केल्या; परंतु कारवाई झालीच नाही. वाळू चोरीचा गोरखधंदा बिनदिक्कतपणे चालू असल्याचा अनुभव शेलगावथडी येथील महिलांना आला आहे.

कलम १४४ नावालाच
एकीकडे गोदापात्रातून वाळूचोरीच्या तक्रारी वाढत असताना दुसरीकडे महसूल प्रशासनाने गोदापात्रात कलम १४४ लागू केले आहे. सध्या त्याचा तसूभरही परिणाम वाळूमाफियांवर झाला नाही. उलट कलम १४४ कलम केवळ कागदोपत्री ठरत आहे.

दोषींवर कडक कारवाई करणार
माजलगाव तालुक्याच्या हद्दीमधील गोदापात्रामध्ये जमाबंदी आदेश लागू केला आहे. कोणी त्याचे उल्लंघन करून वाळूची तस्करी करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. -शेखनूर, प्रभारी तहसीलदार,माजलगाव
बातम्या आणखी आहेत...