आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदिपान भुमेरेंनी मागितली माफी; नेरूरकरांचे कारवाईचे संकेत

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर जाहीरपणे टीका करून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करणार्‍या संदिपान भुमरे यांच्या अडचणी वाढल्या आहे. भुमरेंनी सोमवारी संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरूरकर यांची औरंगाबादेत भेट घेऊन माफी मागितली. परंतु हे प्रकरण केवळ माफीवर मिटणारे नसून याबाबत पक्षर्शेष्ठी काय ती कारवाई करतील अशी भूमिका नेरूरकर यांनी घेतली. दरम्यान मंगळवारी पैठण तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनीही भुमरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर सोमवारपासून औरंगाबाद शहरात तळ ठोकून आहेत. काल त्यांनी कन्नड, गंगापूर तालुक्यातील पदाधिकार्‍यांसोबत पक्षाच्या वाटचालीबाबत चर्चा केली. मंगळवारी पैठण तालुक्यातील पदाधिकार्‍यांना बोलावले होते. या बैठकीत भुमरेंच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली व पदाधिकार्‍यांची मते जाणून घेण्यात आली.

या बाबत ‘दिव्य मराठी’ने नेरूरकर यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, भुमरे यांनी आपली भेट घेऊन झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. परंतु माफीवर हे प्रकरण मिटेल असे वाटत नाही. खैरे हे पक्षाचे उपनेते आहेत. त्यांच्यावर जाहीरपणे टीका करणे योग्य नाही. त्यामुळे पक्षर्शेष्ठीच त्यांच्याबाबत काय तो निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. भुमरे यांनी सोमवारी माफी मागितल्यामुळे त्यांना मंगळवारच्या बैठकीसाठी बोलावले जाईल अशी शक्यता होती, परंतु तसे झाले नाही. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेते भुमरेंवर नाराज असल्याचे यावरून स्पष्ट होते.
राजकारण: भुमरे-खैरे वादात शिवसैनिक सैरभैर
खैरेंमुळेच जिल्ह्यात शिवसेनेची पीछेहाट: संदिपान भुमरे
नाराज संदिपान भुमरे यांची वेगळी चूल?