आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sangh Get Chance, Ban On Us Why ? Owasi Ask Question

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघाला मुभा, आम्हाला मात्र बंदी असे का? - ओवेसी यांचा सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- रा. स्व. संघ परिवारातील लोकांना महाराष्‍ट्रा त येण्याची मोकळीक दिली जाते, आमहाला मात्र बंदी घातली जाते. हा कोणता न्याय आहे, असा सवाल मजलिसे इत्तेहादुल मुसलमिनचे (एमआयएम) हैदराबाद येथील खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी केला. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. हिंदुत्ववादी तत्त्वांना आमचा विरोध आहे आणि पुढेही तो राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद पोलिस आयुक्तालय हद्दीत प्रवेशबंदी असल्याने ओवेसी नांदेडहून जालना, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्रीमार्गे खुलताबादेत आले होते. जॉर्डनमधील गुरूसमवेत त्यांनी येथील औरंगजेब समाधीला भेट दिली. ख्वाजा बाबा बु-हानुद्दीन यांचा दर्गा आणि येथील मोहंमद पैगंबर यांच्या पोषाखाचेही दर्शन घेतले. येमेनहून त्यांचे 12 समर्थकही आले होते.
या वेळी पत्रकार परिषदेत ओवेसी यांनी केवळ पाच प्रश्नांची उत्तरे दिली.
मालेगाव स्फोट व धुळे दंगलप्रकरणी राज्याने काय कारवाई केली, असा सवाल त्यांनी केला. 2014च्या निवडणुकीला अद्याप वेळ असल्याचे सांगून त्यांनी यावर बोलणे टाळले. बंदीमागे काँग्रेस-राष्‍ट्रवादीचा हात आहे काय यावर ओवेसी म्हणाले की, सत्ताधारी आपल्याला रोखू शकत नाहीत. न्यायलयावर आपला विश्वास असून, आपल्याला न्याय मिळेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एमआयएमचे आमदार भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्या चिथावणीखोर भाषणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयातच त्यावर फैसला होईल.
चौकट...
कडेकोट पोलिस बंदोबस्त,
कॅमे-याद्वारे हालचाली टिपल्या
ओवेसी बुधवारी पहाटे 4 वाजता बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आले. तेथून 9 वाजता ते दर्ग्यात पोहोचले. जॉर्डनहून आलेले गुरू शेख नुहू यांच्या भेटीसाठी ते दर्ग्यात थांबले होते. अप्पर पोलिस अधीक्षक संदीप जाधव, उपअधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह 4 निरीक्षक व 60 पोलिस तैनात होते. हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले होते. दुपारी 1 वाजता ओवेसी हैदराबादकडे रवाना झाले.