आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sangramanagara Flyovers Should Be; Increased Issue

संग्रामनगर उड्डाणपूल हवाय; अडचणीही वाढल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहर व सातारा परिसरातील एक लाख लोकवस्तीला जोडणार्‍या संग्रामनगर उड्डाणपुलाखाली रेल्वे फाटक सुरू न ठेवल्यास अडचणी वाढणार आहेत. उड्डाणपुलाच्या आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटक सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

संग्रामनगर परिसरातील देशपांडेपुरम, शहानूरमियां दर्गा परिसर, देवानगरी, द्वारकापुरी, राजनगर, प्रतापनगर हा पन्नास हजार लोकवस्तीचा भाग आहे. रेल्वेलाइनच्या दोन्ही बाजुला मोठय़ा वसाहती, शाळा, महाविद्यालय आहेत. उड्डाणपुलावरून जाण्यासाठी फुटपाथची तरतूद नाही. त्यामुळे पादचार्‍यांनी कोठून जावे, हा प्रश्न आहे. सातारा परिसरातून मोठय़ा संख्येने नागरिक शहरात येतात व तेवढय़ाच संख्येने सातारा परिसरात जातात. रेल्वे फाटक बंद केल्यास पादचार्‍यांनी कोठून यावे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. पुलाखाली मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत.

रेल्वे गेट बंद केल्यास व्यावसायिकांनाही दुकाने बंद करावी लागतील. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पैठण रस्त्यावरील उड्डाणपुलाप्रमाणेच संग्रामनगरचा पूल करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

दूध, भाजीपाला, किराणा आदींसाठी नागरिकांना दोन्ही बाजूंना जावे लागते. शिवाय उड्डाणुपलाखालील व्यावसायिकांचाही विचार व्हावा. रेल्वे फाटक सुरू न ठेवल्यास उड्डाणपुलाखाली दारुड्यांचे साम्राज्य निर्माण होईल. साधना सुरडकर.

परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे फाटक सुरू ठेवावे

उड्डाणपुलावरून पायी चालणारांसाठी फुटपाथ नाही. सातारा परिसरातून मोठय़ा संख्येने पायी चालत नागरिक शहरात येतात. रेल्वे फाटक सुरू नसल्यास त्यांनी कोठून यावे? पूल शहरासाठी आवश्यक असून पुलामुळे समस्यांमध्ये वाढ होणार आहे. र्शीमंत गोरडे

उड्डाणपुलाखालील वसाहतींचाही विचार व्हावा. मला गॅसचे सिलिंडर आणण्यासाठी रेल्वेलाइनच्या पलीकडे जावे लागते. उड्डाणपूल झाल्यानंतर सिलिंडर वरून आणावे लागेल. फाटक सुरू ठेवल्यास सहजगत्या सिलिंडर आणता येईल. -विमल साबळे, देवानगरी

शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी मोठय़ा पुलांची आवश्यकता आहे, परंतु त्यासोबत स्थानिक रहिवाशांची परवड होता कामा नये. संग्रामनगर परिसरातील नागरिकांच्या नियमित गरजांची पूर्तता करण्यासाठी संग्रामनगर येथील रेल्वे फाटक सुरू ठेवावे. खासदार चंद्रकांत खैरे

रेल्वे गेटवर उड्डाणपूल केल्यानंतर त्याखाली भुयारी मार्गाची तरतूद नाही. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर रेल्वे गेट बंद करावे लागते. संग्रामनगरवासीयांची मागणी रेल्वे बोर्डासमोर ठेवण्यात येईल. पी. सी. शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड

माझी मुलगी पोदार शाळेत शिक्षण घेते. तिला दररोज शाळेत सोडण्यासाठी जावे लागते. त्यानंतर मलाही बँकेत जावे लागते. उड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वे फाटक सुरू न ठेवल्यास नागरिकांना एक किमीचा वळसा घालून जावे लागेल. -हिंदवी संतोष काकडे, बँक कर्मचारी, देवानगरी.

राजकारण नको, फाटक हवे

संग्रामनगर उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मंत्र्यांची वाट न पाहता पूल सुरू करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आली आहे. शिवसेना खासदार व आमदारांनी रेल्वे फाटकाचे निमित्त पुढे करून उड्डाणपुलाचे उद्घाटन लांबवू नये, अशी मागणी कॉ. अश्फाक सलामी, शहर सहसचिव भास्कर लहाने, डॉ. एस. एम. नईम, जयर्शी गायकवाड, अभय टाकसाळ, प्रकाश बनसोडे, मधुकर खिल्लारे यांनी केली.