आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संग्रामनगर उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वीच राजकीय ‘संग्राम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-लग्न सोहळय़ाला बोलावून शरद पवार यांच्या हस्ते संग्रामनगर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला जात असून तो उधळून लावण्यात येईल, असा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिला. तर खैरे यांनी आपले कौशल्य पणाला लावावे, असे प्रत्युत्तर आमदार सतीश चव्हाण यांनी दिले. त्यामुळे उद्घाटनावरून राजकीय संग्राम सुरू झाला आहे. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांच्या उपस्थितीत रविवारी पुलाखाली झालेल्या कार्यक्रमात खैरे यांनी हा इशारा दिला.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक प्रबोधचंदर शर्मा यांच्या उपस्थितीत खासदार चंद्रकांत खैरे यांनी सग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी केली. या वेळी परिसरातील नागरिक व मेट्रो औरंगाबाद असोसिएशनच्या वतीने खैरे आणि विभागीय व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले. उड्डाणपुलाखालील रस्ता सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

खैरेंच्या कार्यावर विश्वास :
पुलाखालील रस्ता सुरू ठेवण्यासाठी महापालिकेला रक्कम भरावी लागेल. त्यानंतर केंद्राच्या वतीने परवानगी देण्यात येईल. महापालिका खैरेंच्या ताब्यात असून केंद्रातही त्यांचा दबदबा आहे. केंद्राच्या अखत्यारीतील अनेक कामे मंजूर करण्यात त्यांचा हातखंडा आहे. इथेही आता त्यांनी आपले कौशल्य पणाला लावावे. त्यांच्या दिल्ली कार्यकुशलतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याची बोचरी टीका आमदार सतीश चव्हाण यांनी केली. उद्घाटनासाठी कुणाला निमंत्रित करावे हे प्रशासनाचे काम आहे. पवार यांना उद्घाटनास आणण्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निश्चित केले आहे. माझ्या कन्येचा विवाह सहा महिन्यांपूर्वीच ठरलेला आहे. कन्येला आशीर्वाद द्यायला खैरे यांनी यावे. आम्हीही त्यांच्या लग्नकार्याला उपस्थित होतो.

का चढला खैरेंचा पारा ?
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी काही दिवसांपूर्वी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनीदेखील पुलाची पाहणी केली. त्यांनी पुलाचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होईल, असे जाहीर केले. आमदार चव्हाण यांच्या घरात लग्नसमारंभ असून यानिमित्त पवार शहरात येत आहेत. घाईघाईत उद्घाटन उरकून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उड्डाणपूल केल्यानंतर रेल्वे भुयारी मार्ग अथवा फाटक बसवण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांची परवड होणार आहे. या मुद्दय़ावरून खैरे यांचा पारा चढला.

काय म्हणाले खैरे ?
शहराचा खासदार मी असून या विभागाचे आमदार शिवसेनेचे संजय शिरसाट आहेत. आम्हा लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरवला जात आहे. लग्नकार्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांना बोलावले जात आहे. लग्नात उड्डाणपुलाचे उद्घाटन उरकले जाणार आहे. जोपर्यंत संग्रामनगरच्या नागरिकांसाठी पुलाखालील फाटक उघडले जात नाही तोपर्यंत उद्घाटन होऊ दिले जाणार नाही. लवकरच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन देण्यात येईल. पैठण रोडवरील उड्डाणपुलाच्या धर्तीवर या फुलाचेही फाटक सुरू ठेवण्यात यावे.

रेल्वेची विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांनी रविवारी पुलाची पाहणी केली. खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्याकडे पुलाच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या मांडल्या.