आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sangramnagar Railway Crossing Stop Says S S Soin

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संग्रामनगरची लेव्हल क्रॉसिंग हलवणार - एस. एस. सोईन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बारा हजार वाहनांची प्रतिदिन वर्दळ असलेल्या संग्रामनगर उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हिश्शाचे काम सुरू करण्यासाठी लेव्हल क्रॉसिंग शिफ्ट करण्याचे काम आठ दिवसांत केले जाणार आहे. या कामामुळे वाहनधारकांना ये-जा करणे सुलभ होईल, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. सोईन यांनी 29 मार्च रोजी औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या व्हीआयपी हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबादहून मुंबई, नागपूर व चेन्नईसाठी नुकत्याच रेल्वे बजेटमध्ये जाहीर केलेल्या गाड्या एक वर्षाच्या काळात सुरू होणे अपेक्षित असल्याचे सोईन यांनी सांगितले. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर दीड महिन्यात फूड प्लाझा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपरोक्त फूड प्लाझामध्ये आयआरसीटीसीने ठरवलेल्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध होतील. औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला निधी मिळाल्यानंतर राहिलेल्या पाच कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होणार आहे.

लिफ्ट आणि एक्सलेटरला प्राधान्य देणार
रेल्वेस्थानकावर अपंग व वृद्धांसाठी लिफ्ट बांधण्याचे काम सहा महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. उपरोक्त कामास निधी उपलब्ध न झाल्याने ते प्रलंबित आहे. बजेटमधील निधी प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त काम तातडीने सुरू करण्यावर भर दिला जाईल, असे सोईन यांनी सांगितले. चिकलठाणा येथे पिटलाइन उभारण्यासाठीचा प्रस्ताव दिल्याचे त्यांनी सांगितले. संग्रामनगर उड्डाणपुलासाठी रेल्वेकडून विलंब होत असल्याचे विचारल्यानंतर त्यांनी, रेल्वेचे सिग्नल बदलण्याचे काम सावधानतेने करावे लागते. उड्डाणपुलाचे काम चांगल्या एजन्सीकडे दिले आहे. वाहनधारकांसाठी रस्ता हलवण्याचे काम आठ दिवसात पूर्ण केले जाईल.

रस्त्याची उंची किती ठेवायची, चढउताराचे गणित सर्व व्यवस्थित झाल्यावरच लेव्हल क्रॉसिंग शिफ्ट केली जाते, असे सोईन यांनी सांगितले.