औरंगाबाद - महिला, ज्येष्ठांसाठी मदत केंद्र उभारले, शिक्षेचे प्रमाण व तपासाचा दर्जा वाढवला, पोलिसांचा धाक बाळगण्याऐवजी संपूर्ण समाजालाच पोलिसांसोबत जोडण्याचा प्रयोग आपण यशस्वी करून दाखवला. मात्र, व्यसनाधीन आणि मद्यधुंद पतींना प्रतिबंध घालून शहरातील महिलांना दिलासा देण्याचा अन् सुखी संसार निर्माण करण्याचा संकल्प राहून गेल्याची खंत मावळते पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी व्यक्त केली.
कार्यकाळाचा मागोवा घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेल्या खास बातचितीमध्ये त्यांनी अनेक मुद्दय़ांना स्पर्श केला. पोलिस आयुक्तपदाची सूत्रे 28 मे 2011 रोजी स्वीकारणारे संजयकुमार म्हणाले, ‘13 पोलिस ठाण्यांच्या 13 पोलिस उपनिरीक्षकांना पैरवी अधिकारी म्हणून न्यायालयात तैनात करून शिक्षेचे प्रमाण वाढवले. संवेदनशील शहरात एकही जातीय दंगल होऊ दिली नाही. धार्मिक सलोखा निर्माण केला. महिला पोलिसांना पारंपरिकतेच्या जोखडातून बाहेर काढून त्यांना गार्ड ड्यूटी, बीट मार्शल म्हणून नेमले, एवढेच नव्हे, तर ड्रायव्हरचे प्रशिक्षण देऊन वाहनचालक बनवले. साडीऐवजी युनिफॉर्म घालण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. पोलिस फोर्समध्ये अधिक शिस्त आणि विश्वासाचे वातावरण तयार केले. सगळ्यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले..!’ दत्तक गाव योजना, अवैध दारूचे धंदे आणि गुन्हेगारांना गजाआड करण्यास आपण तसूभरही कमी पडलो नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, संकल्प केलेल्या सर्वच गोष्टी साध्य करण्यात आपण यशस्वी होऊ शकलो नसल्याचेही त्यांनी मान्य केले. तटस्थपणे स्वत:चे मूल्यमापन करताना ते म्हणाले, ‘मला सांगायला आनंद वाटतो की, 80 टक्के संकल्प पूर्ण केले आहेत. 20 टक्के काम अजूनही करायचे होते. मात्र, ते राहून गेल्याची खंत कायम राहील.!’ कौटुंबिक हिंसाचारामध्ये अधिक गुन्हे हे व्यसनाधीन आणि मद्यपी पतींमुळे घडतात. त्यांच्यावर कायदेशीर प्रतिबंध घालण्याचा माझा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ राहून गेला. यामुळे गरीब महिलांचा संसार तर सुखाचा झालाच असता, त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकारालाही आळा बसला असता, असा सामाजिक दृष्टिकोनही त्यांनी मुलाखतीतून स्पष्ट केला. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यश मिळल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कामांना मिळाला नाही वेळ
* वडगाव कोल्हाटीप्रमाणे नारेगाव दत्तक घेणे
* महात्मा गांधी तंटामुक्त शहर योजना अपयशी
* ज्येष्ठांसाठी मदत केंद्राचे स्वरूप व्यापक करणे
* श्रुती भागवत यांच्या मारेकर्यांना पकडणे
मग वाहतूक पोलिसांचा दोष काय?
शहरात आठ लाख वाहने आहेत. त्याशिवाय बाहेरगावाहून येणार्या वाहनांची संख्याही अधिक आहे. वाहतुकीचे नियम पाळणार्यांपेक्षा मोडणार्यांची संख्या अधिक आहे. नियम पाळलेच जात नाहीत, शिवाय सरासरी चार हजार वाहनांमागे एक वाहतूक पोलिस असल्यामुळे त्यांनाही हतबल व्हावे लागते. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले तरच वाहतूक व्यवस्थित होऊ शकते. अन्यथा वाहतुकीची समस्या जैसे थे राहील, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.