आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjeev Gomates Sculpture Issue At Aurangabd, Divya Marathi

कलेचे प्रशिक्ष्‍ाण न घेताच सर्व महापुरुषांचे साकारले हुबेहुब शिल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कुठलीही कला अवगत करण्यासाठी एखाद्या नामांकित संस्थेत प्रशिक्षण घ्यावे लागते असे अजिबात नाही. कलेची साधना आणि आसक्ती असेल तर कला आपल्यात उतरतेच.! जेमतेम दहावीचे शिक्षण घेतलेल्या उदय कॉलनीतील संजीव गोमटे यांनी अशीच शिल्पकला संपादन करून आपला छंद जोपासला आहे. दहा वर्षांपासून हुबेहूब शिल्प साकारून ‘हम भी कुछ कम नही.!’ असाच संदेश देत व्यावसायिक शिल्पकारांना त्यांनी खुणावले. विशेष म्हणजे, गोमटे हे पूर्णवेळ पोलिस सेवेत असून कामाच्या धबडग्यातून वेळ काढत त्यांनी हा छंद जोपासला.

पोलिस सेवेतील वडील भास्कर गोमटे आणि गृहिणी पुष्पा यांचे चिरंजीव संजीव यांच्या कलासक्तीबाबत लहानपणापासूनच घरात चर्चा होती. आधी पैठण येथील जि.प. शाळा आणि नंतर औरंगाबादेतील जि.प. शाळेत संजीव यांना चित्रकलेची आवड जडली. मात्र चित्रांना घरात फारशी स्तुती मिळत नसल्यामुळे त्यावेळी संजीव अनेकदा व्यथित होत असत. आपले करिअर कलेतच करण्याची त्यांची इच्छा होती, मात्र वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी 1990 मध्ये पोलिस भरतीत आपले कसब दाखवले. शिपाई म्हणून रुजू झाल्यानंतर आता त्यांच्या सेवेला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. क्राइम ब्रँचसाठी अनेक गुन्हेगार पकडणारे पोलिस जमादार संजीव यांच्या या ‘सॉफ्ट स्कील’ विषयी पोलिस विभाग अनभिज्ञ आहे. प्रसिद्ध शिल्पकार सुनील देवरे यांना 2002 मध्ये त्यांनी शिल्पकला अवगत करण्यासाठी गुरू मानले. त्यांच्याकडून हळूहळू शिल्पकलेचे धडे घेत गोमटे आता परिपूर्ण शिल्पकार झाले आहेत. त्यांनी तयार केलेले शिल्प संस्था किंवा विशेष व्यक्तींना विनामूल्य भेट म्हणून त्यांनी दिले. सेवानिवृत्तीनंतर ग्रामीण भागात कमी किमतीत शिल्प उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, ज्ञानेश्वर माउली, रणरागिणी अहिल्याबाई होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींची शिल्पे त्यांनी साकारली आहेत.

गुरुजीच माझे जे. जे. स्कूल
मला माहिती आहे की, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून अनेक जण शिल्पकलेचे धडे घेतात. मात्र शिल्पकार सुनील देवरे हेच माझ्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आहेत. त्यांच्याकडून घेतलेली ही कला माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली आहे. शिक्षणाला वयाची अट नसते, त्यामुळे लहानपणी केलेला संकल्प आता पूर्ण झाल्यामुळे मी समाधानी आहे. संजीव गोमटे, शिल्पकार तथा पोलिस जमादार.