आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणाऐवजी दान देऊन केली संक्रांत साजरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणवार थाटात साजरा करण्याऐवजी त्याचा खरा अर्थ समजून समाजातील गरजवंतांना याप्रसंगी आनंद देणे म्हणजेच खरा सण करणे होय. याचा परिपाठ खिंवसरा फोर्ट येथील महिला मंडळ तीन वर्षांपासून राबवत आहेत. नुकत्याच झालेल्या संक्रांत सणात या मंडळाने हळदी-कुंकवानिमित्त इतर खर्च न करता वाण म्हणून बालिकाश्रमातील मुलांसाठी किराणा सामान घेऊन दिले. एवढेच नव्हे, त्यांच्यासाठी कपडे, पुस्तके व इतर साहित्यही देऊन आगळ्या पद्धतीने संक्रांत साजरी केली.

प्रीती पुराणिक या खिंवसरा फाेर्ट येथे राहतात. त्यांनी व त्यांच्या काही मैत्रिणींनी एकत्र येऊन एक महिला मंडळ स्थापन केले. मेघना मराठे, दीपाली जामगावकर, चित्रा कोटगिरे, कोमल मगनानी, सपना सिंह, उमा शानबाग, मुग्धा केळकर, सुलोचना खंडागळे, आरती भिडे, अश्विनी सावंत, जयश्री रणखांब, अनुराधा साटम, अनिता खराडे, प्रीती जैन, विद्या ठोंबरे, संध्या बिन्नीवाले, पद्मजा डावरी, स्मिता अग्रवाल, मंजूषा आरबड, मनीषा कंक, राजश्री मोरे आणि स्वप्ना सरोदे यांचा समावेश आहे. या सर्वांनी आगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला.

मिळतोय वेगळा आनंद
तीन वर्षांपासून हे मंडळ वेगळ्या प्रकारे संक्रांत साजरी करते. एका वर्षी त्यांनी "साकार' या संस्थेला १० हजार ५०० रुपयांची मदत केली होती. दुसऱ्या वर्षी संतोष गर्जे यांच्या "आई' या उपक्रमाला ८ हजार ५०० रुपयांची मदत केली हाेती. या वर्षी मकरसंक्रांतीनिमित्त बालिकाश्रमातील मुलामुलींना साडेपंधरा हजार रुपयांचा किराणा, कपडे आणि वह्या-पुस्तके घेऊन दिली.

मुलांची भावनिक साद
या वेळी आश्रमशाळेतील प्रतीक्षा बोर्डे आणि पूजा हरळ या मुलींनी दोन कविता सादर करून आपल्या भावनांना वाट करून दिली.

"आई माझी मायेचा सागर
दिला तिने जीवनाला आधार...'
व आणखी एक गीत सादर करून भावना व्यक्त केल्या.
साऱ्यांचे सहकार्य
-मी आधीच्या कॉलनीत असे उपक्रम राबवायचे. आता नवीन कॉलनीतही सर्व मिळून हा उपक्रम राबवत आहोत.
प्रीती पुराणिक, सदस्य, महिला मंडळ