आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष्यांसाठी घरटी लावून संक्रांत साजरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पक्ष्यांसाठी घरटी लावून दीपशिखा फाउंडेशनतर्फे मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. नायलॉनच्या मांजामुळे निष्पाप मुले, वयस्कर व्यक्ती, वाहनचालक जखमी होतात. काही वेळा प्राणही गमवावे लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेकडो पक्षी जखमी होतात. ही बाब लक्षात घेऊन दीपशिखा फाउंडेशन, लायन्स क्लब चिकलठाणा व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे जिमनॅशिअम हॉल येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला.

डॉ. संजीव सावजी यांनी यशस्वी होण्यासाठी आव्हानाला स्वीकारताना येणाऱ्या ताणतणावाला कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. विजय दहिफळे यांनी खेळत असताना होणारे अपघात कसे होतात, होणाऱ्या जखमा आणि त्यावर तत्काळ करायचे उपचार यावर माहिती दिली. शरीर, मन व निसर्ग यांची परस्परपूरकता समजावून सांगितली. ढासळलेला निसर्गाचा समतोल व आपले निसर्गाच्या प्रति कर्तव्य, पक्ष्यांची निसर्गाच्या समतोलातील भूमिका व महत्त्व याबद्दलची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर पक्ष्यांची घरटी कशी लावावी याबद्दल एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशनचे अमेय देशपांडे यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी झाडावर घरटी लावून येत्या काळात निसर्गाचे रक्षक बनून संगोपन करण्याची शपथ घेतली. सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष दत्ता कदम, सचिव राजेश लहुरीकर, एम. के. अग्रवाल, रवींद्र खंडेलवाल, राजेश जाधव, राजेंद्र लोहिया, मोहन पटेल, राजन थापा, स्पोर्ट््स अथॉरिटी ऑफ इंडियाचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, डी.एल. पवार, संतोष, गायकवाड, राठोड, एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशनचे श्रवण परळीकर, स्वप्निल मोगरे यांची उपस्थिती होती.